आज दिवसभर कोल्हापूर, सांगली, सातारा, तसेच कोकण या ठिकाणी जाण्यासाठी पुणे-सातारा रस्त्यावर वाहनांची संख्या वाढली होती. मात्र, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व रिलायन्स इन्फ्रा यांच्या चुकीच्या नियोजनामुळे गणेशोत्सवासाठी निघालेल्या प्रवाशांना खड्ड्यांचा व काही ठिकाणी वाहतूककोंडीचा सामना करावा लागला, त्यामुळे प्रवाशांनी टोल भरूनसुद्धा या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने संताप व्यक्त केला.
खेड-शिवापूर टोलनाका ओलांडून पुढे गेल्यावर शिवरे व वरवे (ता. भोर) या हद्दीतील रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत, त्यामुळे तेथे वाहतूककोंडी होऊन वाहनांना एक किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी सुमारे वीस मिनिटे लागत होते. खड्ड्यांचे साम्राज्य असूनही टोलवसुली जोरात सुरू आहे हा कुठला नियम, असा खोचक प्रश्न साताराला जाणारे प्रवासी अमर गायकवाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.
-----------
फोटो ओळी : ०९खेडशिवापूर वाहतूककोंडी
फोटो क्रमांक : गणेशोत्सवाच्या सुटीनिमित्त गावी निघालेल्या पुण्यातील प्रवाशांना अशा वाहतूककोंडीला सामोरे जावे लागले.