- लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : पावसामुळे पडलेल्या खड्ड्याांमुळे वाहतूक मंदावून सोमवारी सायंकाळनंतर शहराच्या विविध भागांत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन वाहनचालकांचे हाल झाले. वाहतूककोंडीच्या चक्रव्यूहात दीर्घकाळ अडकून पडावे लागल्याने नागरिकांची चीडचीड झाली. अखेर वाहतूक सिग्नल बंद करुन मोठ्या प्रमाणावर तुंबलेली वाहने मार्गी लावून पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत वाहतूक पूर्ववत केली. खराडी, हडपसरमधील साईनाथनगर, नगर रस्ता, तसेच जंगली महाराज रस्ता, आपटे रस्ता, विधी महाविद्यालय रस्ता, प्रभात रस्ता, भांडारकर रस्ता याशिवाय कर्वे रस्त्याचा काही भाग आणि या रस्त्यांना येऊन मिळणारे उपरस्ते अशा सर्वंच भागात सायंकाळनंतर वाहतूककोंडी झाली होती. चार दिवसांपासून होणाऱ्या पावसामुळे अनेक रस्त्यांवर डांबरीकरणाला तडे जाणे किंवा खड्डे पडणे असा अडथळा निर्माण झाला आहे. सोमवारी दिवसभर अधूनमधून पावसाच्या सरी पडत असल्याने दुपारपर्यंत तुलनेने वाहतूक कमी होती. सायंकाळी शाळा, महाविद्यालये आणि खासगी कार्यालये तसेच कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांची सुटी झाल्यानंतर वाहतुकीचा मोठा ताण रस्त्यांवर आला. खड्डे चुकवित मार्ग काढण्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला. अवजड वाहने वळताना मागील वाहतूक कोंडली गेली. तसेच घुसखोरांमुळे त्या भागात एकच कोंडी होऊन राहिली. बंद असलेले सिग्नल्स, काही ठिकाणी पोलिसांचा अभाव यामुळे शहराच्या पश्चिम भागात काही ठिकाणी आज सायंकाळनंतर नागरिकांना बराच वेळ वाहतूक कोंडीमध्ये अडकून राहावे लागले. नागरिकांपैकी काही जणांनीच वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केल्याचे प्रभात रस्त्यावर दिसून आले. भांडरकर रस्ता, प्रभात रस्ता, आपटे रस्ता व त्याला मिळणारे उपरस्ते अशा ठिकाणी सायंकाळी ७ नंतर वाहतूक कोंडी टप्प्याटप्प्याने होत गेली. भंडारकर रस्त्यावरील वाहनांची रांग पाहून प्रभात रस्त्याकडे वाहने वळविणाऱ्यांना याही रस्त्यावर बराच वेळ कोंडीमध्ये अडकून राहावे लागले. काही वेळाने तुंबलेल्या वाहतुकीचा ताण विधी महाविद्यालय रस्त्यावरही आला. या कोणत्याही परिसरात पोलिसांची उपस्थिती नव्हती.कोंडी केव्हा फुटेल याची वाट पाहत वाहनचालकांना जागीच थांबून राहवे लागले. आपटे रस्त्यावरही महात्मा फुले संग्रहालयापासून डेक्कन जिमखान्यापर्यंतच्या भागात कोंडी झाल्याचे नागरिकांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत ही परिस्थिती होती.अनेक ठिकाणी पोलिसांनी सिग्नल बंद करुन हाताने इशारे करत वाहतूककोंडी फोडण्याचा प्रयत्न केला.खड्ड्यांमुळे कोंडी : अशोक मोराळेवाहतूक पोलीस उपायुक्त अशोक मोराळे म्हणाले, वाहतुकीचा प्रचंड ताण, रस्त्यांना पडलेले खड्डे यामुळे खराडी, हडपसर, नळस्टॉपचा परिसर, डेक्कन जिमखाना अशा परिसरात वाहतूककोंडी झाली. हडपसरमधील साईनाथनगरमधील पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे झाल्याने कोंडीचा त्रास त्या भागात अधिक झाला. मात्र मी स्वत: परिस्थितीचा आढावा घेत वायरलेसवरून कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सूचना देत होतो. पावसातही रेनकोट घालून कर्मचाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत वाहतूक पूर्ववत केली.
वाहतूककोंडीचा चक्रव्यूह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 4:16 AM