पुणे : प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) सर्व प्रकारचे शुल्क आॅनलाइन पद्धतीने स्वीकारले जात आहेत. मात्र, मंगळवारी सलग चौथ्या दिवशीही आॅनलाइन प्रणाली बंद असल्याने वाहतूकदारांची गैरसोय झाली. त्यामुळे विविध संघटनांनी मंगळवारी आरटीओ कार्यालयासमोर आंदोलन केले. तसेच आॅफलाइन पद्धतीने शुल्क स्वीकारण्यास सुरुवात न केल्यास येत्या दोन दिवसांत सर्वपक्षीय आंदोलन केले जाईल, असा इशारा विविध संघटनांकडून देण्यात आला.राज्य शासनाने नोव्हेंबर महिन्यापासून राज्यातील आरटीओ कार्यालयात आॅनलाइन प्रणालीद्वारे कामकाज करण्यास सुरुवात केली. तसेच त्यातील दोष दूर न करता त्याच्या अंमलबजावणीची सक्ती करण्यात आली. मात्र, प्रणालीत दोष असल्यामुळे व्यावसायिक वाहतूकदार, रिक्षा, ३ चाकी टेम्पो, ट्रक, टेÑलर चालक यांना आॅनलाइन प्रणालीतून कर भरताना अडचणी येत आहेत. गेल्या तीन दिवसांपासून सर्व्हर डाऊन असल्याने आरटीओ कार्यालयाचे कामकाज ठप्प होते.मंगळवारी सलग चौथा दिवशीही आॅनलाइन प्रणाली सुरू न झाल्याने वाहतूकदारांना त्रास सहन करावा लागला. त्यामुळे महाराष्ट्र राज्य माल व प्रवासी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे यांच्यासह विविध संघटनांच्या पदाधिकाºयांनी आंदोलन करून निषेध नोंदवला.बाबा शिंदे म्हणाले, की आॅनलाइन प्रणाली बंद असल्याने वाहनाचे पासिंग करून घेण्याची इच्छा असूनही वाहकांना दंड भरावा लागत आहे. तसेच बँकेचा बोजा लावणे किंवा उतरवणे ही कामे होत नसल्याने आर्थिक कोंडी होत आहे. आॅनलाइन यंत्रणेमुळे सुविधेऐवजी त्रासच अधिक होत आहे.तसेच वेळेत पासिंग न केल्याने चुकीच्या पद्धतीने ५० रुपये दंड आकारला जात आहे. त्यामुळे येत्या शुक्रवारपासून आॅनलाइन व आॅफलाइन पद्धतीने शुल्क न स्वीकारल्यास सर्वपक्षीय आंदोलन केले जाणार आहे.आरटीओ कार्यालयाकडून आॅनलाइन प्रक्रिया एनआयसी व स्टेट बँकेच्या मदतीने राबविली जाते. सर्व्हरचे काम सुरू असल्याने आॅनलाइन शुल्क आकारणीमध्ये अडचणी येत होत्या. मात्र, मंगळवारी दुपारी चार वाजल्यापासून आॅनलाइन प्रक्रिया सुरळीतपणे सुरू झाली आहे.- संजय राऊत, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी
आरटीओसमोर वाहतूकदारांचे आंदोलन, आॅनलाइन शुल्क प्रणाली त्रासदायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 4:51 AM