लोणावळा - नाताळाच्या पूर्वसंध्येला मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीने ठप्प झालेल्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज थर्टी फस्टच्या पूर्वसंध्येला वाहनांची संख्या तुरळक असल्याने द्रुतगतीच्या दोन्ही मार्गावरील वाहतुक सुरळीतपणे सुरु होती. मात्र या उलट परिस्थिती लोणावळ्यात पहायला मिळाली.
द्रुतगतीवर वाहतुक कोंडी असण्याची शक्यता ध्यानात घेत मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी राष्ट्रीय महामार्गाला प्राधान्य दिल्याने लोणावळ्यातून जाणार्या राष्ट्रीय महामार्गावर दुतर्फा कोंडी झाली होती. मागील शनिवार, रविवार व सोमवारी मोठ्या संख्येने पर्यटक नाताळाची सुट्टी एन्जॉय करण्याकरिता घराबाहेर पडल्याने तीन दिवस द्रुतगती मार्ग हा वाहतुक कोंडीने कासवगती झाला होता.
थर्टी फस्टच्या शनिवार व रविवारी देखिल वाहनांची संख्या वाढून कोंडी होण्याची शक्यता ध्यानात घेत द्रुतगतीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच गाड्या बंद पडल्या क्रेन व मॅकानिक काही दुर्घटना रुग्णवाहिका उपलब्ध ठेवण्यात आल्या आहेत. मात्र मागील शनिवार व रविवारच्या कोंडीची परिस्थिती पाहता पर्यटकांनी द्रुतगतीने प्रवास करण्याचे टाळले असल्याचे चित्र आज पहायला मिळाले. दुपारपर्यत मार्गावर वाहनांची संख्या तुरळक होती.