भोर : पंढरपूर-भोर-महाड राष्ट्रीय महामार्गाच्या खंडाळा व भोर तालुक्यातील रस्ता रुंदीकरणाला सुरुवात झाली. हिरडोशी भागात सध्या हे काम वेगाने सुरू आहे. मात्र झालेल्या बांधकामावर पाणी मारले जात नाही. मोठ्या प्रमाणात धुरळा उडत असून, कोणत्याही प्रकारचे सूचनाफलक लावलेले नाहीत. यामुळे वाहनांच्या रांगा लागत आहेत. याचा नाहक त्रास वाहनचालकांना सहन करावा लागत आहे.पंढरपूर-महाड या राष्ट्रीय मार्गावरील भोर तालुक्यातील शिंदेवाडी फाटा (ता. खंडाळा) ते वरंध घाट भोर तालुका या रस्त्याच्या कामासाठी सुमारे ७२३ कोटी रुपयांचा निधी मंजूर असून, सुरुवातीला मोठमोठी झाडे तोडली. खंडाळा तालुक्यात विंग ते भोर तालुका हद्दीतील महाड नाका ते वेनवडी, पोम्बर्डी आंबेघर येथील मोऱ्या, तर वेणुपुरी, कोंढरी, हिरडोशी, वरवंड, शिरगाव हद्दीत हे काम वेगाने सुरू आहे.
रस्त्याच्या साइडपट्ट्याचे रुंदीकरण, रस्त्याशेजारील डोंगर खोदाई, नवीन मोऱ्या टाकणे, संरक्षक भिंती बांधणे, ही कामे सुरू आहेत. एकाचवेळी सर्वच ठिकाणी ही कामे सुरू आहेत. वेणुपुरी हद्दीत एका बाजूची साइडपट्टी खोदून भराव करण्याचे काम व मोऱ्यांसाठीचे खोदकाम करण्यात येत आहे. वेणुपुरी ते कोंढाळकरवाडी हद्दीदरम्यान दोन्ही बाजूंचे खोदकाम केल्याने दुहेरी वाहतुकीला मोठी अडचण होत आहे.दरम्यान, वेगाने सुरू असलेल्या कामातील संरक्षक भिंतीच्या झालेल्या बांधकामावर पाणी मारले जात नसल्याचे नागरिकांकडून तक्रारी करत आहेत. भोर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. भोर-महाड रस्त्यावरील हिरडोशी खोऱ्यातही पावसाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे या भागात पाऊस काळात एका बाजूला धरण आणि दुसऱ्या बाजूला डोंगर यामुळे काम करताना अडचणी निर्माण होण्याच्या शक्यतेने पहिल्या टप्प्यातील कामास हिरडोशी भागात सुरुवात करण्यात आली आहे. जास्तीत जास्त काम याच भागात होणार आहे.दर्जेदार काम करण्याची मागणीसध्या कामाला वेग आला आहे. कामामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दगडमाती पडल्याने वाहतुकीला अडथळा होत असून धुरळा उडत आहे. याचा नाहक त्रास प्रवासी नागरिकांना होत आहे. भोर-महाड रस्त्यावरील हिरडोशी भागात सुरू असलेले काम दर्जेदार व्हावे तसेच अपघात टाळण्यासाठी जागोजागी सूचनाफलक लावण्यात यावेत. माती असलेल्या ठिकाणी धुरळा उडत असल्याने पाणी मारण्यात यावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, स्थानिक नागरिकांच्या सूचनांचा प्राधान्याने विचार रस्त्यावर धुरळा उडू नये म्हणून व झालेल्या कामावर पाणी मारण्यात येत असून सूचनाफलकही लावण्यात असल्याचे संबंधित ठेकेदारांच्या प्रतिनिधींकडून सांगण्यात आले आहे.