पुणे - वाहतूक पोलिसांनी ‘फॅन्सी नंबर प्लेट’विरुद्ध १ आॅक्टोबरपासून विशेष मोहिम सुरु केली आहे. गेल्या आठ दिवसात २१० वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली असून तब्बल २ लाख १० हजारांचा दंड वाहनचालकांकडून वसूल करण्यात आल्याची माहिती उपायुक्त अशोक मोराळे यांनी दिली. यासोबतच जागेवरच या नंबर प्लेट काढून टाकण्याची कारवाई केली आहे. वाहनावर फॅन्सी नंबर प्लेट लावणे बेकायदा आहे. आरटीओच्या नियमांनुसार ठराविक नमुन्यातीलच नंबर प्लेट वाहनावर असणे अपेक्षित आहे. मात्र, वाहनचालक अनेकदा आकर्षक आणि चित्रविचित्र नंबर प्लेट वाहनांवर लावतात. त्यामुळे अनेकदा वाहनाचा क्रमांक व्यवस्थित कळत नाही. अपघात झाला किंवा अपघातसदृश परिस्थिती निर्माण केल्यास त्या वाहनाचा क्रमांकही नागरिकांना व्यवस्थित टिपता येत नाही. अनेकदा वाहनांवर भाऊ, दादा, आप्पा, आई, साई, किंग, आण्णा आदी अक्षरे क्रमांकांच्या माध्यमातून तयार केली जातात. अशा भाऊ दादांना वाहतूक पोलिसांनी झटका द्यायला सुरुवात केली आहे. फॅन्सी नंबर प्लेट लावण्याचे प्रमाण वाढले असून नंबर प्लेट तयार करुन देणा-या दुकानदारांकडूनही नियमांचे पालन केले जात नाही. त्यामुळे कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. १ आॅक्टोबरपासून सुरु करण्यात आलेल्या या मोहिमेमध्ये दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनांवर कारवाई केली जात आहे. दंडात्मक कारवाईसोबतच नंबर प्लेट काढून टाकण्याचीही कारवाई केली जात आहे. १ आॅक्टोबर ते ७ आॅक्टोबरदरम्यान २१० वाहनचालकांवर केलेल्या कारवाईमध्ये २ लाख १० हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये सुरु असलेल्या या कारवायांमध्ये अनेक गमतीशीर नंबरप्लेट पोलिसांना पहायला मिळत आहेत. पुण्यात कारवाईदरम्यान थांबवलेल्या एका मोपेडवर तर चक्क ‘नवरा’ अशी अक्षरे स्पष्टपणे दिसणारी नंबर प्लेट लावण्यात आलेली होती. तर एकाने ‘लव्ह’ अशी अक्षरेच ८०७९ या मराठी आकड्यांमधून तयार केली होती. तर एका दुचाकीवर ६१९२ या क्रमांकावरुन ‘ठाकूर’ अशी अक्षरे तयार केली होती. एका दुचाकीवर २२४१ या क्रमांकामधून ‘रेश्मा’ हे अक्षर बनविले होते.
‘फॅन्सी नंबर प्लेट’विरुद्ध वाहतूक पोलिसांची मोहीम
By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2017 5:24 PM