पुणे : संभाजी पुलावर दुचाकीला बंदी असताना त्यावरुन आलेल्या वाहनचालकाकडून ७०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वाहतूक शाखेच्या पोलिसाला रंगेहाथ पकडले़. रमेश रामकिसन शिरसाट (वय ३२) असे या पोलीस शिपायाचे नाव आहे़. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सांगितले की, संभाजी पुलावरुन दुचाकी वाहनांना बंदी आहे़ तक्रारदार हे बाहेरगावाहून आलेले होते़. ते डेक्कनकडून टिळक रोडकडे जात असताना संभाजी पोलीस चौकीसमोर टिळक चौकात त्यांना शिरसाट यांनी पकडले व त्यांच्याकडे लायसन्सची मागणी केली़. त्यावेळी आपल्याकडे लायसन्स नसल्याची व या पुलावर नो एंट्री असल्याची माहिती नाही असे सांगितले़. त्यावर शिरसाट यांनी १२०० रुपयांची मागणी केली़. इतके पैसे नसल्याचे त्यांनी सांगितल्यावर शिरसाट यांनी दुचाकी ठेवून घेतली व पैसे घेऊन येण्यास सांगितले़. दुपारी सव्वादोन वाजता तक्रारदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आले़. त्यानंतर पोलिसांनी पडताळणी केली. तेव्हा शिरसाट हे पैशांची मागणी करीत असल्याचे आढळून आले़. त्यानंतर पाचच्या सुमारास टिळक चौकात सापळा लावण्यात आला़. तक्रारदारांनी त्यांना १२०० रुपये दिले़. त्यातील ५०० रुपये परत केले़. त्यांनी पावती मागितल्यावर त्यांना कसली पावती असे म्हणून निघून जाण्यास सांगितले़. यावेळी तेथे सापळा रचून थांबलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी शिरसाट यांना रंगेहाथ पकडले़. विश्रामबाग पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येत आहे़. शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी केले आहे़.
वाहतूक पोलिसाला लाच घेताना रंगेहाथ पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 8:41 PM
संभाजी पुलावर दुचाकीला बंदी असताना त्यावरुन आलेल्या वाहनचालकाकडून ७०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वाहतूक शाखेच्या पोलिसाला रंगेहाथ पकडले़.
ठळक मुद्देपावती मागितल्यावर त्यांना कसली पावती असे म्हणून निघून जाण्यास सांगितले़लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन