पुणे : पीएमपी बस अन बंद पडणे आता नित्याचेच झाले आहे. दरराेज शहरातील विविध भागांमध्ये मार्गावर बंद पडलेल्या पीएमपी बसेस नेहमीच दिसून येतात. या बंद पडेलेल्या बसेसमुळे माेठी वाहतूक काेंडी देखील हाेत असते. अशीच एक बस मंगळवारी विमाननगर भागात बंद पडली. या बसमुळे वाहतूकीस अडथळा निर्माण हाेत असल्याने वाहतूक पाेलिसांनी कारवाई करत या बसवर पाच हजारांचा दंड ठाेठावला आहे.
शहरातील वाढत्या वाहनांमुळे वाहतूकीची समस्या गंभीर झाली आहे. त्यातच मार्गावर बंद पडणाऱ्या पीएमपी बसेसमुळे या काेंडीत भरच पडत असते. अनेकदा तासंतास या बसेस मार्गातून दूर केल्या जात नाहीत. त्यामुळे वाहनचालकांना मनस्तापाला सामाेरे जावे लागते. अशीच एक बस मंगळवारी विमाननगर भागात बंद पडली. या बसमुळे माेठ्याप्रमाणावर वाहतूकीला अडथळा निर्माण हाेत असल्याने वाहतूक पाेलिसांनी या बसवर कारवाई करत तिच्यावर पाच हजारांचा दंड ठाेठावला.
पीएमपीच्या राेज सुमारे सत्तरपेक्षा अधिक बसेस मार्गावर बंद पडतात. काही दिवसांपूर्वी मार्गात बंद पडलेली बस लवकर दूर न केल्याने चालकावर पाेलिसांनी गुन्हा देखील दाखल केला हाेता. जुन्या बसेस मार्गावर धावत असल्याने तसेच बसेसची याेग्य प्रकारे डागडुजी केली जात नसल्याने बसेस मार्गावर बंद पडण्याचे प्रमाण वाढत आहे.