पुणे: जुना ४०० रुपये ऑनलाईन दंड भरण्यास सांगितले म्हणून एका वाहतूक पोलीस हवालदाराला आयटी अभियंत्याने कारने तब्बल ८०० मीटर फरफटत नेऊन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. हा थरार मुंढवा सिग्नल चौक खराडी बायपास रोड साईनाथ नगर ते झेन्सार कंपनी फाटा येथे शुक्रवारी दुपारी घडला. शेवटी स्थानिक नागरिक व इतर पोलिसांनी चारचाकी गाडीचा पाठलाग करून कर्मचार्याची सुटका केली. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी अभियंता प्रशात श्रीधर कांतावार (वय ४३, रा. महंमदवाडी हडपसर) याला अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार शेषराव जायभाय यांनी फिर्याद दिली आहे.
जायभाय हे वाहतूक शाखेत कार्यरत असून शुक्रवारी दुपारी ते येथील मुंढवा चौकात कर्तव्यावर होते. त्यावेळी कांतावर हा तेथून कारने निघाला होता. त्याच्या गाडीवर ४०० रुपये दंड असल्यामुळे जायभाय यांनी त्याला थांबवून दंडाची ऑनलाईन रक्कम भरण्यास सांगितले. त्यावेळी कांतावर याने त्यांच्याशी अर्वाच्य भाषेत बोलून तुम्ही पोलिस केवळ पैसेच वसूल करता, तुम्हाला दुसरी कामे नाहीत का असे म्हटले. दरम्यान जायभाय कांतावर याला समजावून सांगत केवळ दंडाची ऑनलाईन रक्कम भरण्यास सांगितले. त्यावेळी कांतावर याने कार चालू करून निघून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी जायभाय यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता, कांतावर याने कार वेगात पळवली.
अचानक झालेल्या प्रकारामुळे जायभाय गाडीवर पडले. त्यांनी काच साफ करण्याच्या वायफरला पकडले होते. तरी देखील कांतावर याने त्याची गाडी वेगात पळवली. जायभाय गाडीला लटकलेले होते. हा प्रकार पाहून स्थानिक नागरिक व पोलिसांनी कांतावर याचा पाठलाग केला. तोपर्यंत कांतावर याने आठशे मीटर पर्यंत जायभाय यांना लटकवत नेले होते. झेन्सार कंपनी फाटा येथे एक ट्रक आडवा आल्याने कांतावर याने गाडी थांबवली. त्यावेळी पोलिसांनी त्याला पकडून जायभाय यांची सुटका केली. जायभाय यांच्या हाताला खरटले असून, उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. मुंढवा पोलीस तपास करीत आहेत.