पुणे - आत्तापर्यंत ‘खरा पुणेकर कोण?’ हे सांगणारे अनेक किस्से आपण ऐकले असतील. मुंबई- पुणे- मुंबई या सिनेमातून पुणेकर तरुण कसे असतात, हे दाखविण्यात आले आहे. पुणेकरांची वैशिष्टे सर्वांनाच माहीत आहेत. असं असलं तरी पुणे वाहतूक पोलीस आता खरा पुणेकर कसा असतो, हे सांगणार आहेत. वाहतूक पोलिसांनी पुणेकरांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यासाठी काही व्हिडीओ तयार केले असून, त्या माध्यमातून ‘खरा पुणेकर कोण?’ हे सांगण्यात आले आहे.पुण्याची लोकसंख्या गेल्या काही वर्षांत कमालीची वाढली आहे. त्यामुळे रस्त्यांवर वाहतूकदेखील मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यातच पुण्यात दुचाकींची संख्या सर्वाधिक असल्याने वाहतूककोंडीची समस्या नित्याचीच झाली आहे. असे असताना वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांमुळे अनेकदा वाहतूककोंडी होते.वाहतूक नियमांचे पालन न केल्याने अनेकांना आपले प्राणदेखील गमवावे लागले आहेत. वाहतूक पोलिसांच्या आकडेवारीनुसार एकट्या जानेवारी २०१८मध्ये शहर परिसरात २७ प्राणांतिक अपघात झाले होते. त्यामुळे वाहतूक पोलीस सातत्याने अपघातांची संख्या कमी करण्याकडे लक्ष देत होते.यासाठी विविध स्तरांतून जनजागृतीबरोबरच नियमभंग करणाºयांवर कडक कारवाई करण्यात आली. त्याचा परिणाम हा जानेवारी २०१९मध्ये दिसून आला. या महिन्यात प्राणांतिक अपघातांची संख्या १५वर आली आहे.हे प्रमाण मागच्या वर्षीच्या तुलनेत ४४ टक्क्यांनी कमी झाले आहे. तसेच, एक जानेवारीपासून वाहतूक शाखेकडून हेल्मेट न घालणाºयांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. यावर अनेक स्तरांतून टीका होत असली तरी या कारवाईचा सकारात्मक परिणाम नागरिकांवर होत असल्याचे दिसून येत आहे.सध्या अनेक नागरिक हेल्मेट वापरण्यास प्राधान्य देत आहेत.सोशल मीडियावर व्हिडीओवाहतुकीच्या विविध समस्यांवर मार्ग काढण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून १० ते ११ जनजागृतीपर व्हिडीओ तयार करण्यात आले आहेत. येत्या काळात विविध समाज माध्यमांमधून हे व्हिडीओ नागरिकांपर्यंत पोहचविण्यात येतील.या माध्यमातून वाहतुकीचे सर्व नियम पाळणारा, हाच खरा पुणेकर असल्याचा संदेश देण्यात आला आहे. या व्हिडीओमधून फुटपाथवरून वाहने नेऊ नका, वाहन चालवताना मोबाईलचा वापर करू नका, झेब्रा क्रॉसिंगवरूनच रस्ता ओलांडा, चारचाकी चालवताना सीटबेल्ट वापरा असे विविध संदेश देण्यात आले आहेत. पुण्याच्या वाहतूक उपायुक्त तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली हे व्हिडीओ तयार करण्यातआले आहेत.
वाहतूक पोलीस सांगणार खरा पुणेकर!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2019 2:42 AM