पुणे : शहरातील वाहतूकसमस्या आणि बेशिस्त वाहनचालकांना चाप लावण्यासाठी वाहतूक पोलिसांनी हाती घेतलेली विशेष मोहीम पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. नोटाबंदीमुळे; तसेच चलन तुटवड्यामुळे नागरिकांना सुट्या पैशांची चणचण निर्माण झाली आहे. रोजच्या व्यवहारांना पैसे नसताना दंड भरण्यासाठी कोठून पैसे आणायचे, म्हणून नागरिकांनी त्यांना विनंती केली होती. नागरिकांच्या विनंतीला मान देत त्यांनी ही कारवाई मागे घेतल्याचे ‘लोकमत’ला सांगितले. ‘अचानक’पणे केव्हाही आणि कुठेही वाहतूक पोलीस वाहन तपासणी करणार होते. वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या वाहनचालकांवर या मोहिमेदरम्यान विशेष लक्ष ठेवून कारवाई केली जाणार होती. शहरातील प्रमुख रस्ते, महत्त्वाचे चौक; तसेच विविध भागांमध्ये अचानकपणाने तपासणी मोहीम राबवली जाणार होती. या मोहिमेला गुरुवारी सुरुवातही करण्यात आली होती. कारवाईदरम्यान वाहतूक पोलीस आणि नागरिकांचे खटकेही उडत होते. काही नागरिकांनी थेट पोलीस आयुक्तांनाच संपर्क साधून ही कारवाई थांबविण्याची विनंती केली होती. दैनंदिन व्यवहारांसाठी पैसे जुळविताना सध्या नागरिकांची दमछाक होत आहे. त्यात दंड भरण्यासाठी रक्कम द्यायची म्हणजे अडचणीचे होते. नागरिकांच्या विनंतीचा संवेदनशीलपणे विचार करून ही कारवाई पुढे ढकलण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
नोटाबंदीमुळे वाहतूक पोलिसांचा ‘टॉलरन्स झोन’
By admin | Published: November 18, 2016 6:35 AM