पुणे: गेल्या अनेक वर्षांपासून केवळ चर्चा असलेला ‘पाषाण -पंचवटी ते कोथरुड असा बोगदा तयार करण्यास अखेर सल्लागार नेमण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. यामुळे सेनापती बापट रस्त्यावरील वाहूतक कोंडी फुटण्यास मदत होणार आहे. या सल्लागाराकडून लवकरच याबाबतचा प्रकल्प आराखडा तयार करण्यात येणार आहे.सेनापती बापट रस्त्यावर गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणत वाहूतक कोंडी वाढली आहे. या रस्त्यावर असलेल्या शैक्षणिक संस्था, हॉटेलस्, कार्पोरेट आॅफीसेसची संख्या वाढली. यामुळे वाहतूक कोंडीमध्ये अधिकच भर पडला आहे. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेच्या सन २०१७-१८ च्या अंदाजपत्रकात या कामासाठी सुमारे एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. या बोगद्यामुळे या दोन्ही रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण कमी होणार असून शहराच्या पूर्व पश्चिमेकडील जोडणारा नवीन मार्गही तयार होणार आहे. पाषाण तसेच औंध, पंचवटी, बोपोडी या भागातून नागरिकांना कोथरूड तसेच वारजेकडे जाण्यासाठी सध्या सेनापती बापट रस्त्याचा वापर करावा लागतो. तर कोथरूडकडून बालेवाडी-बाणेरकडे जाणारी बहुतांश वाहतूक मुंबई-पुणे महामार्गावरून होत असली, तरी हा रस्ता लहान वाहनांसाठी धोकादायक आहे. त्यामुळे सेनापती बापट रस्त्याचा वापर केला जातो. तसेच शहराच्या पूर्व आणि दक्षिण उपनगरांमधून आलेल्या वाहनांना पश्चिमेकडे जाण्यासाठी याच रस्त्यांचा वापर करावा लागतो. परिणामी, या दोन्ही रस्त्यांवर दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन पाषाण- पंचवटी ते कोथरूड असा बोगदा करण्याचे काम महापालिकेच्या विकास आराखड्यात प्रस्तावित होते. त्यास शासनाने मान्यता दिल्याने २०१७-१८ च्या अंदाजपत्रकात या कामासाठी स्वतंत्र तरतूदही करण्यात आलेली आहे. या प्रकल्पाचा फिजिबिलीटी अहवाल, नकाशे वाहतूक नियोजन आराखडा, वाहूतक विभाग व वन विभागाच्या आवश्यक मान्यता, टोपोग्राफी, सर्वेक्षण आदी सर्व गोष्टींसाठी स्वतंत्र सल्लागाराची नियुक्ती करण्याची गरज आहे. यामुळे स्थायी समितीच्या बैठकीत सल्लागार नियुक्त करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी सांगितले.---------------- बोगद्याचा निर्णय नागरिकांशी चर्चा करूनपाषाण-पंचवटी ते कोथरुड या प्रस्तावित बोगद्याला पंचवटी भागातील नागरिकांनी विरोध केला आहे. त्यामुळे महापालिकेच्या वतीने सध्या केवळ सल्लागार नियुक्ती करून प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. हा आराखडा तयार झाल्यानंतर स्थानिक नागरिकांची चर्चा करून त्यांना विश्वासात घेऊनच पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. परंतु हा बोगदा व रस्त्यांचे काम झाल्यास नागरिकांचा सुमारे सुमारे किलोमीटर अंतराचा फेरा वाचणार असून एक नवीन पर्यायी रस्ता निर्माण होणार आहे. त्यामुळे नागरिकांशी चर्चा करूनच पुढील निर्णय घेण्यात येईल, असे योगेश मुळीक यांनी सांगितले.
सेनापती बापट रस्त्याची वाहतूक कोंडी अखेर फुटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 1:42 PM
सेनापती बापट रस्त्यावर गेल्या काही वर्षांत शैक्षणिक संस्था, हॉटेलस्, कार्पोरेट आॅफिसेसची संख्या वाढली. यामुळे वाहतूक कोंडीमध्ये अधिकच भर पडला आहे.
ठळक मुद्देपाषाण-पंचवटी ते कोथरुड बोगदा : सल्लागार नियुक्ती