पुणे : शहरातील वाहतूककोंडीला कारणीभूत ठरत असलेल्या पीएमपी बसच्या वाहतुकीला वाहतूक पोलिसांनी बेड्या घातल्या आहेत. गाडी बसथांब्यावर आखून दिलेल्या पट्ट्यामध्ये न थांबविणे, सिग्नल जंप करणे, झेब्रा क्रॉसिंगच्या मागे गाडी न थांबविणे, रस्त्यामध्ये ब्रेकडाऊन झाल्यानंतर तातडीने गाडी रस्त्यातून बाजूला न काढणे अशा प्रकारे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांकडून सरसकट १०० रुपयांचा दंड आकारला जात आहे. गेल्या दोन दिवसांत तब्बल २०७ हून अधिक बसचालकांकडून अडीच लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असूनही मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले. शहरातील रस्त्यांवर ब्रेकडाऊनचे प्रमाण वाढल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. त्यातच या गाड्या पीएमपीकडून रस्त्यातून बाजूला केल्या जात नसल्याने ऐन वर्दळीच्या वेळी मोठी वाहतूककोंडी होऊन पोलिसांचा सर्वाधिक वेळ वाहतूक नियोजनाऐवजी वाहतूककोंडी सोडविण्यातच जातो. त्यामुळे ब्रेकडाऊन झाल्यानंतर गाडी रस्त्यातून बाजूला न केल्यास संबधित वाहक व चालकांवर कारवाई करण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. बुधवार (दि. ९)पासून ही कारवाई सुरू करण्यात आली असून, गुरुवारीही सुमारे २०० बसवर कारवाई करण्यात आली असल्याचे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान, या पोलिसांनी ही भूमिका घेतल्यानंतर पीएमपीकडूनही सर्व चालकांना वाहतुकीचे नियम पाळण्याच्या कडक सूचना देण्यात आल्या असून, नियमभंग करणाऱ्या बसमध्ये सर्वाधिक बस खासगी ठेकेदारांच्या असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
वाहतूक शिस्तीच्या पीएमपीला ‘बेड्या’
By admin | Published: March 11, 2016 1:55 AM