देहूरोड : दोन महिन्यांपूर्वी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने निगडी - देहूरोड चौपदरीकरण व देहूरोड येथील उड्डाणपुलासह एलिवेटेड रस्त्याच्या कामाचे आदेश दिल्यानंतर उड्डाणपूल व एलिव्हेटेड रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराने लोहमार्गावर उड्डाणपूल उभारण्याच्या कामास सुरुवात केली असून, गेली बारा वर्षे रखडलेले काम सुरु करण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. उड्डाणपूल व एलिव्हेटेड रस्त्याचे काम झाल्यानंतर थेट जाणा?्या वाहतूककोंडीच्या त्रासातून, तसेच वारंवार होणारे अपघातापासून स्थानिकांची कायमची सुटका होणार आहे . देहूरोड बाजार परिसरातील सर्वाधिक वर्दळीच्या जुना बँक आॅफ इंडिया चौक व स्वामी विवेकानंद चौक या दोन्ही चौकांतील वाहतूककोंडीतून देहूरोड पंचक्रोशीतील स्थानिकांसह वाहनचालकांची सुटका होण्यासाठी लोहमार्ग ते गुरुद्वारा दरम्यान एक किलोमीटर लांबीचा एलिव्हेटेड रस्ता बांधण्यास सुरुवात केली असून, सध्याच्या दुपदरी रस्त्याच्या एका बाजूला मोठ्या आकाराच्या वाहिन्या टाकण्यात येत असून, दुसऱ्या बाजूला रस्त्याचे खोदकाम सुरू करण्यात आल्याचे चित्र मंगळवारी दिसून आले आहे. उड्डाणपूल व एलिवेटेड रस्त्याचे काम करणाऱ्या संबंधित ठेकेदाराची ४३ कोटी २० लाख रुपयांची निविदा स्वीकारण्यात आलेली आहे . तसेच निगडी ते देहूरोड पोलीस ठाण्यादरम्यानच्या चौपदरीकरणासाठी दुसऱ्या ठेकेदाराची ३० कोटी ६ लाख १३ हजार ८९२ रुपयांची निविदा स्वीकारण्यात आलेली आहे. दोन्ही कामे पूर्ण करण्यासाठी १८महिन्यांची मुदत देण्यात आलेली आहे . महामार्गाच्या एका बाजूला (दक्षिणेला) मोठ्या आकाराच्या वाहिन्या टाकण्यात येत असून, मंगळवारी काम वेगात सुरु होते, तर महामार्गाच्या दुसऱ्या बाजूला बाजारपेठेच्या बाजूला (उत्तरेला) रस्त्याचे खोदकाम यांत्रिक पद्धतीने सुरु असल्याचे दिसून आले . काम सुरु असल्याने रस्त्यालगत लोखंडी अडथळे लावण्यात आले असून महामार्गावरील वाहतूक दिवसभर संथगतीने सुरु होती . त्यामुळे स्थानिकांना थेट जाणाऱ्या वाहतुकीचा त्रास कायमचा दूर होणार आहे . निगडीतील देहूरोड कॅन्टोन्मेन्ट बोर्डाच्या हद्दीपासून महामार्गाचे चौपदरीकरण करण्याचे काम देहूरोड पोलीस ठाण्याच्या नजीक असणाऱ्या देहूरोड-कात्रज बायपास सुरु होणाऱ्या वाय जंक्शनपर्यंत करण्यात येणार आहे . सध्या महामार्गालगत मोकळ्या जागेतील सफाई करण्याची कामे प्राथमिक स्तरावर सुरु झाली असून विविध ठिकाणी आडवे चर खोदण्यात आले असून सोमवारपासून निगडी बाजूने कॅन्टोन्मेन्ट बोर्डाच्या निगडी जकात नाक्यापासून केंद्रीय विद्यालयापर्यंत मोकळ्या भागात यंत्राच्या साह्याने सफाई करण्यात येत असल्याचे दिसून आले . विविध ठिकाणी पांढरे पट्टे आखून सीमानिश्चित करण्यात आली आहे . (वार्ताहर)
वाहतूक कोंडीतून होणार सुटका
By admin | Published: January 11, 2017 3:00 AM