लोणी काळभोर : भरधाव वेगाने आलेल्या कारने दुसऱ्या कारला जोराची धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कारचालकासह एक अनोळखी इसम जागीच मृत्यूमुखी पडला आहे. ही घटना पुणे-सोलापूर महामार्गावर फुरसुंगी फाटा येथे घडली आहे. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
या अपघातात व्हेन्टो कारचालक श्रीनिक प्रभाकर होले (वय-२७ वर्ष रा. यवत ता. दौड जि. पुणे) व एक अनोळखी इसम नाव व पत्ता माहित नाही) हे दोघे मयत झाले आहेत. तर अल्टो कारचालक अनिल मारुती जाधव (वय २१, रा. पोंढे ता. पुरंदर जि. पुणे) याचेसह सुनिल निलेश शितकल (वय १८, रा. केसनंद, वाघोली पुणे) व संकेत बाळु भंडलकर (वय १८, रा. भंडलकर वस्ती, केसनंद, ता. हवेली जि. पुणे) हे गंभीर जखमी झाले आहेत.
याप्रकरणी हर्षल संजय चांदणे (वय-२६, रा. कवडीपाट, टोलनाक्याजवळ, लोणी काळभोर, ता. हवेली) या बांधकाम व्यवसायिकांनी दिलेल्या फिर्यादी वरून अल्टो कार चालक अनिल जाधव याचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही कारची धडक झाल्याने एक कार तीनशे मिटर पुढे महामार्गालगत असणा-या निलगिरीच्या झाडावर आदळून पुन्हा पुणे सोलापुर महामार्गावर आली. त्यातील इसम हा रोडवर पडला. त्याचे डोक्यातून खुप रक्तस्त्राव होत होता. तो बेशुध्द झाला होता. त्याचवेळी अल्टोने महामार्गाचे बाजुने जाणारे एका इसमाला धडक दिल्याने तो बाजुला असणारे खड्डात उडून पडाला. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.