लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पेट्रोलचे प्रतिलिटरचे दर पुण्यात सोमवारी (दि. १८) गगनाला भिडले. लिटरचा दर ९१ रुपये ३० पैसे झाल्याने ग्राहक त्रस्त झाले. सन २०१३ मधल्या प्रतिलिटर ९३ रुपये दरानंतर गेल्या सात वर्षांत प्रथमच पेट्रोलदर एवढे भडकले आहेत.
डिझेल व सीएनजीच्या दरातही वाढ झाली. डिझेल ७८ रुपये प्रतिलिटर होते ते ८० रुपये झाले. सीएनजी ५१ रुपयांवरुन ५५ रुपये ८० पैसे झाला. “आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या एका पिंपाचे दर ६० डॉलरवर गेल्याने ही दरवाढ झाली”, असे ऑल इंडिया पेट्रोल डिलर असोसिएशनचे राष्ट्रीय प्रवक्ता अली दारुवाला यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
यापूर्वी सन २०१३ मध्ये पेट्रोल ९३ रुपये प्रतिलिटर झाले होते. त्या वेळी आंततराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर प्रतिबॅरल १५० रुपये झाल्याने दर वाढले. आज झालेली दरवाढ ही त्यानंतरची दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च ठरली. कच्च्या तेलाचे दर कमी होईपर्यंत ही दरवाढ कायम राहण्याची शक्यता आहे.
राज्य सरकारने १ एप्रिल २०२० पासून पेट्रोलवर १ रुपया अधिभार लावला. त्याशिवाय सन २०१८ मधला २ रुपये दुष्काळी अधिभार अजूनही कायमच आहे. केंद्र सरकारनेही दोन वर्षांपूर्वी जादा उत्पादन शुल्क लादले होते. तेही तसेच आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील दर अन्य राज्यांपेक्षा नेहमीच जास्त असतो. आज दिल्लीत पेट्रोल ८३ रूपये प्रतिलिटर आहे, पण महाराष्ट्रात पेट्रोल दराने नव्वदी पार केली.
दारुवाला यांनी सांगितले की, असोसिएशनने केंद्र सरकारकडे वाढीव उत्पादन शुल्क कमी करण्याची आणि राज्याकडे अधिभार कमी करण्याबाबतची लेखी मागणी केली. केंद्र सरकारने यासंदर्भात बैठक घेऊन चर्चा करण्याचे आश्वासन दिले आहे. राज्य सरकारने अद्याप उत्तरही दिलेले नाही.
चौकट
पेट्रोल शंभर रुपयांवर तरी न्या...
“केंद्राने मे २०२० मध्ये १० रुपयांची तर मार्च २०२० मध्ये ३ रुपयांची करवाढ गेल्या वर्षात पेट्रोलवर केली. राज्य सरकारनेही जून २०२० मध्ये पेट्रोलवरील कर २ रुपयांनी वाढवले. म्हणजे केंद्र व राज्य सरकारने मिळून एका वर्षात पेट्रोलची किंमत पंधरा रुपयांनी वाढवली,” असे सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले. आता पुण्यातले दर ९१ रुपयांवर गेलेच आहेत, तर दोन्ही सरकारांनी मिळून आणखी ९ रुपयांची दरवाढ करावी म्हणजे शंभर रुपये लिटर पेट्रोल होईल. जेणेकरून सुट्ट्यांचा प्रश्न येणार नाही, पैसे देण्याघेण्याची गर्दी न झाल्याने रांग लवकर पुढे सरकेल आणि सरकारलाही उत्पन्न मिळेल,” असा पुणेरी टोमणा त्यांनी मारला.
-विवेक वेलणकर, सजग नागरिक मंच