पुणे : ग्रामपंचायतीच्या मतदानासाठी जाणाऱ्या लोकांना रेल्वेची दारे आतून बंद असल्याने जाता आले नाही. त्यामुळे पुणे स्टेशनवर बराचवेळ गोंधळ झाला होता. सुमारे १ तास ४० मिनिटांनंतर हा गोंधळ संपला आणि रेल्वे मार्गस्थ झाली. ही घटना शनिवारी मध्यरात्री एकच्या सुमारास घडली.
राज्यातील ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींचे मतदान रविवारी पार पडले. यावेळी विविध जिल्ह्यातून आपापल्या गावी जाणाऱ्यांची एकच गर्दी पुण्यातील बसस्थानक, रेल्वे स्टेशनवर झाली होती. यावेळी मुंबई-बिदर रेल्वेने लातूर येथे ग्रामपंचायतींच्या मतदानासाठी जाणाऱ्या मतदारांना रेल्वेची दारे न उघडल्याने माघारी फिरावे लागले.
मुंबई - बिदर रेल्वे शनिवारी रात्री १ वाजून ५ मिनिटांनी पुणे स्टेशनवर दाखल झाली. ही रेल्वे मुंबईतून सुटतानाच फुल्ल झाली होती. पुणे रेल्वे विभागाची हद्द लोणावळ्यापासून सुरू होते. दरम्यान, रेल्वे पुणे स्टेशनवर आली असता आरक्षित कोचसह जनरल कोचचा दरवाजा प्रवाशांनी आतून बंद केला होता. यामुळे प्लॅटफॉर्म क्रं. ५ वर एकच धिंगाणा झाला. त्यातच काही लोकांनी रेल्वे रुळावर बसत आंदोलन सुरू केले. या घटनेची माहिती मिळताच आरपीएफ, जीआरपीसह रेल्वे प्रशासनाचे अधिकारी प्लॅटफॉर्मवर दाखल झाले. त्यांनी संतप्त लोकांची समजूत काढत, रेल्वे आधीपासूनच फुल्ल असल्याने ज्यांना शक्य आहे त्यांनी जावे, उर्वरित लोकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, अशी विनंती केली.
हा वाद सुमारे १ तास ४० मिनिटे सुरू होता, अखेर रेल्वेत जागाच नसल्याने अनेकांनी तेथून काढता पाय घेतला. यावेळी मराठवाड्यात जाणाऱ्या एसटी देखील फुल्ल असल्याने अनेकांनी गावी जाण्याचा बेतच रद्द केला.
पुणे विभागात रेल्वे येण्याआधीच पूर्ण भरलेली होती. जनरल कोच देखील गच्च भरलेला होता. राखीव कोचमध्ये हे लोक घुसण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे रेल्वेचे दरवाजे आतून लॉक केले होते. पुण्यातून लातूरला जाणाऱ्या लोकांमध्ये ९० टक्क्यांपेक्षा अधिक लोकांकडे जनरल तिकीट होते. आम्ही त्यांना पर्यायी मार्गासह दुसऱ्या रेल्वेने जाण्याची विनंती केली. तसेच तिकिटांचे संपूर्ण पैसे परत केले. यातील फक्त ५ ते ६ जणांकडे कन्फर्म तिकीट होते.
- मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, पुणे रेल्वे विभाग