पुणे : रेल्वेत क्लार्कपदाचे नोकरीचे आमिष दाखवून विश्वास संपादन करण्यासाठी युनिफॉर्म शिवण्यासाठी कापड देऊन फसवणुक करणाऱ्या टोळीला रेल्वेपोलिसांनी अटक केली आहे.विश्वजित शिवाजीराव माने (वय ५२, रा़ चव्हाणमळा, आष्टा, ता़ वाळवा, जि़ सांगली) व त्याचे साथीदार हनुमान शिवाजी तानवडे (वय २२, रा़ पिंगेवाडी, ता़ शेवगाव, जि़ अहमदनगर), महेश कारभारी ससे (वय २५, रा़ ससेवाडी, जेऊर, ता़ जि़ अहमदनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़. त्यांचे अन्य साथीदार फरार असून मुख्य सुत्रधार अजित खंडागळे याला रविवारी सकाळी वाईहून ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत हंसराज दत्तोबा जाधव (वय ४४, रा़ लातुर) यांनी फिर्याद दिली आहे़. रेल्वे पोलिसांनी सांगितले की, त्यांचे नातेवाईकांसह वैष्णव देवी येथे देवदर्शनासाठी ग्रुपने गेले होते़. तेथे एका महिलेची व त्यांची मावशी म्हणून ओळख झाली़. त्यानंतर दोन महिन्यांनी जाधव यांच्या आत्याचा मुलगा लक्ष्मण याचे मोबाईलवर फोन आला की, रेल्वेत नोकरी लावायची असेल तर माझी ओळख आहे़, मी काम करुन देते, असे ती महिला म्हणाली़, त्यानंतर २ जानेवारी रोजी जाधव व त्याचे नातेवाईक या महिलेला भेटायला स्वारगेटला गेले़. तेथे या महिलेने विश्वजीत माने याची ओळख करुन दिली. त्यावेळी माने याने दिल्ली येथे राहणारे अजित खंडागळे हे आपले मित्र असल्याचे व ते नोकरी लावून देतील, असे त्याने सांगितले़.
त्यांच्याकडील रेल्वेचे ओळखपत्र दाखविले़ त्यांवर विश्वास बसल्याने त्यांनी त्यांचा पुतण्याचा बायोडाटा दिला़. त्यानंतर माने याने त्याला पुणे रेल्वे स्टेशनवर बोलावून प्रथम ५० हजार रुपये घेतले़. त्यावेळी रेल्वे हॉस्पिटल येथून वैद्यकीय तपासणी करुन घेतली़. त्यानंतर बँक खात्यावर २५ हजार रुपये भरायला लावले़. त्यानंतर त्याला रेल्वेचा युनिफॉर्म शिवण्याकरीता कपडे देऊन १७ जानेवारीला कामावर हजर होण्याचे पत्र दिले़. त्यानंतर त्याने त्याच्या मित्राकडूनही माने याने १ लाख रुपये घेतले़. त्यांनाही माने याने १७ जानेवारी रोजी युनिफॉर्म शिवण्याकरीता कापड देऊन २२ जानेवारी रोजी कामावर हजर राहण्याचे पत्र दिले़ परंतु, प्रत्यक्षात दिलेले पत्र बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी रेल्वे लोहमार्ग पोलिसांकडे फिर्याद दिली.