ठळक मुद्देस्वंयचलित यंत्रणेच्या सहाय्याने ट्रेन व हॉर्न यांचा ध्वनी
धनकवडी : विविध प्रकारच्या आकर्षक मोटार गाड्या, ट्रेन, रेल्वे यार्ड, दूध डेअरी, गाईंचा गोठा, आदींची आकर्षक सजावट आणि स्टेशन असलेला ट्रेन मॉडेल हा कात्रज डेअरीने सादर केलेला हालता देखावा गणेश भक्तांच्या पसंतीस उतरत आहे. पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या कात्रज डेअरी आवारामध्ये गणेशोत्सवाच्या निमित्ताने हा देखावा साकारण्यात आला आहे. या देखाव्याची निर्मिती इंजिनिअरींगच्या शेवटच्या वर्षाला शिकणाऱ्या विशीतील विद्यार्थ्याने पालकांकडून मिळालेल्या पॉकेटमनी व अप्रतिम कल्पकतेतून साकारला आहे. नचिकेत राजगुरव असे या विद्यार्थ्याचे नाव असून त्याने साकारलेला देखावा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी चांगलीच गर्दी केली आहे. भिवराबाई सावंत अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या या देखाव्याविषयी बोलताना नचिकेत म्हणाला, मला लहानपणापासून दिवाळीत किल्ला तयार करणे, घरच्या गणपती पुढे आरास करणे याची आवड होती. मी सहावीत असताना माझ्या पाहण्यात दिवाळीतील किल्ल्यापुढे बॅटरीवर चालणारी रेल्वे आली. त्या रेल्वेसाठी बाहेरुन साऊंडच्या सहाय्याने आवाज दिला होता. दरवर्षी गणपती आले की, माझ्या डोळ्यासमोर हा देखावा उभा राहायचा. मी सर्वसामान्य कुटुंबातून आल्याने खर्चिक असलेली हा देखावा बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे बनवू शकत नव्हतो. मी दहावी उत्तीर्ण झालेनंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा पूर्ण केला. नंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या डिग्रीचे शिक्षण सुरु केले. या कालावधीत वेगवेगळ्या गाड्या, बस, ट्रेन, सजावटीसाठी लागणारे वेगवेगळे साहित्य आणि इलेक्ट्रॉनिक साहित्य जमा केले. मागील तीन वर्षांपासून मी अशा प्रकारचा देखावा सादर करत आहे. यामध्ये आधुनिक तंत्रज्ञान वापरुन मोबाईलद्वारे वाय-फाय च्या सहाय्याने ट्रेन मॉडेलिंग मधील गाड्या धावत असतात. यामध्ये स्वंयचलित यंत्रणेच्या सहाय्याने ट्रेन व हॉर्न यांचा ध्वनी येत असतो. त्यामुळे पाहणाऱ्या प्रत्यक्ष ट्रेन चालू असल्याचे दिसून येते व लाईव्ह आनंद घेता येतो. या देखाव्यासाठी आतापर्यंत सुमारे तीन लाख रुपये खर्च आलेला असून मी माझा पॉकेटमनी वाचवून साठविलेले पैसे तसेच माझी आवड पाहून माझ्या वडिलांनी मला दिलेल्या पैशामधून मी टप्प्या टप्प्याने हा खर्च केलेला आहे. या देखाव्याची संपूर्ण कल्पना नचिकेत याची असून सजावटीसाठी कुमार मारणे, दीपक शर्मा, कुणाल दुधाने, केतन मुजुमले, विजय लोणकर, मिनाज मणियार, नेहा शिंदे, प्राची कदम यांनी साहाय्य केले आहे.