प्रसाद कानडे
पुणे : पुण्याहून धावणाऱ्या रेल्वेचा प्रवास आता अधिक सुरक्षित होणार आहे. कारण रेल्वे प्रशासनाने दिल्ली- मुंबईसह मुंबई- चेन्नई मार्गावर ‘कवच’ यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेतला आहे. कवच ही अपघात रोखणारी यंत्रणा असून, ती रेल्वे मार्गासह इंजिनमध्येदेखील कार्यान्वित केली जाणार आहे. देशातील चार प्रमुख मार्गांवर ही यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. सध्या मुंबई-चेन्नई मार्गावर टेस्टिंगचे काम सुरू असून, लवकरच ती कार्यान्वित करण्याची शक्यता आहे.रेल्वे मंत्रालय रेल्वे गाड्या वेगवान करण्याबरोबरच त्या अधिक सुरक्षित करण्यालादेखील प्राधान्य देत आहे. त्यासाठीच कवच ही यंत्रणा लागू केली जात आहे. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात देशातील २००० किलोमीटर मार्गावर कवच लागू करण्याचा निर्णय घेतला. यात दिल्ली-मुंबईचा समावेश आहे. तसेच मुंबई- चेन्नई व चेन्नई-कोलकाता मार्गावरदेखील कवच असणार आहे. देशातील सुवर्ण चतुष्कोन रेल्वेमार्गावर ही सुविधा असणार आहे.
कवच म्हणजे काय ?
रेल्वेच्या इंजिनमध्ये टीसीएएस (ट्रेन कॉलेजन अव्हॉइड सिस्टीम) ही प्रणाली बसविली जाईल. हे स्पॉट सिग्नलला वायरलेसद्वारे जोडले गेले असणार आहे. यासाठी स्थानकांवर पहिल्यांदाच कम्युनिकेशन टॉवर उभारला जाईल. याच्यामार्फत गाडी वेगाने धावत असलेल्या गाडीने जर सिग्नल लाल असताना जर सिग्नल मोडला तर आपोआप ब्रेक लागून गाडी थांबेल, त्यामुळे पुढचा अपघात टळणार आहे. तसेच हे करीत असताना सहायक रेल्वे चालकाला स्पॉट सिग्नल पाहण्याची गरज नाही. कारण कॅबमध्येच स्क्रीनवर पुढचा सिग्नल कोणता असणार आहे, हे आधीच कळेल, त्यामुळे गाडी थांबवायची की नाही, हे आधीच चालकाला ठरविणे सोपे होणार आहे. यामुळे वेगात सातत्य राहण्यास मदत होणार आहे.
''रेल्वे प्रवास सुरक्षित होण्यासाठी कवच प्रणाली लागू असणार आहे. यासाठी प्रत्येक स्थानकावर स्वतंत्र कम्युनिकेशन टॉवर उभे केले जाईल. याच्या माध्यमातून जर रेल्वे चालक सिग्नल ब्रेक करून पुढे गेला, तर आपोआप रेल्वे थांबेल असे उमेश बोलांडे (कार्यकारी संचालक, टेलिकॉम विभाग, रेल्वे बोर्ड, नवी दिल्ली) यांनी सांगितले.''
''देशातील प्रमुख रेल्वे मार्गांवर ‘कवच’ ही प्रणाली काम करेल. यात मुंबई-चेन्नई रेल्वे मार्गाचादेखील समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे पुण्याहून धावणाऱ्या गाड्यांना देखील कवचचा फायदा होईल. वेगवान प्रवासाबरोबरच तो अधिक सुरक्षित देखील होणार आहे असे शिवाजी सुतार (मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, मुंबई) यांनी सांगितले.''