पुणे : मुलांना लागलेल्या उन्हाळी सुट्ट्या, मतदान, लग्नसराई आदी कारणांमुळे सध्या रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे या गाड्यांना प्रचंड गर्दी वाढली असून, सर्वच रेल्वे गाड्यांचे बुकिंग फुल्ल झाले आहे. या गाड्यांनी प्रवास करण्यासाठी प्रवाशी लवकर स्टेशनवर येत असून, जागा मिळत नसल्याने त्यांना हाल हाेत आहे.
प्रवाशांच्या सोईसाठी रेल्वे प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात विशेष गाड्या साेडल्या आहेत. या विशेष गाड्यांनाही मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. त्यामुळे पुणे रेल्वे स्टेशन प्रवाशांच्या गर्दीचे फुलून गेले आहेत. सध्या अनेक गाड्यांना वेटिंग आहे. त्यात गेल्या काही दिवसांपासून लांब पल्ल्याच्या गाड्यांना उशीर होत असल्याचे दिसून येत आहे. रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक बिघडल्याचा फटका प्रवाशांना बसत आहे.
या मार्गावर गाड्या वाढल्यामुळे रेक पोहोचण्यास उशीर होत आहे. तसेच, काही वेळा तांत्रिक कारणामुळे रेक वेळेवर पोहोचत नाहीत. त्याचा फटका पुढील गाड्यांच्या वेळापत्रकावर बसतो. त्यामुळे काही गाड्यांना उशीर होत असल्याचे रेल्वेचे अधिकारी सांगत आहेत. यावेळी प्रवाशांना पूर्वसूचना देण्याची देखील व्यवस्था केली जाते.