चंद्रकांत लोळे कामशेत : येथील पंचशील कॉलनीमधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील वर्ग खोल्यांना रंगरंगोटी करून लहान मुलांची आवडती आगगाडी साकार करण्यात आली आहे. शिवाय या आगगाडीवर विविध सामाजिक संदेश रेखाटल्याने विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात आगगाडीत बसून शिक्षण घेण्याचा आभास होत आहे. तर स्थानिक नागरिक यांना येथे येऊन सेल्फी काढण्याचा आपला मोह पूर्ण करीत आहे.कामशेत शहरातील जुन्या मुंबई-पुणे महामार्गाच्या पलीकडे असलेल्या पंचशील कॉलनीमधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नुकताच रेल्वे फालाट स्टेशनचा बोर्ड लागला असून, त्यावर शाळेचे नाव टाकण्यात आले आहे. या शाळेतील चार वर्गखोल्यांवर रंगरंगोटीच्या माध्यमातून अगदी हुबेहूब चिमुकल्यांची आगगाडी नुकतीच साकारण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह आजूबाजूच्या नागरिकांचा औत्सुक्याचा विषय बनला आहे. या आगगाडीमुळे विद्यार्थ्यांच्या गैरहजेरीचे प्रमाण घटले आहे. त्यामुळे उत्साहाचे वातावरण आहे.शिक्षकांचा मराठीचा आग्रहया प्राथमिक शाळेत चार वर्गखोल्या असून, यात १ ली ते ४ थी पर्यंतचे शिक्षण होत आहे. या शाळेची एकूण पटसंख्या ७९ आहे. यात ४० मुले आणि ३९ मुली शिक्षण घेत आहेत. त्यांना शिक्षणाचे धडे देण्यासाठी तीन शिक्षक असून, पालकांचा ओढा मराठी शाळांकडे होण्यासाठी ते कायम कार्यरत आहेत.विविध संघटनांची आर्थिक मदतशाळेच्या वर्गखोल्यांवर आगगाडी साकारण्यासाठी मॅजिक बस, मोंडेलिझ शुभारंभ या संस्थांनी आर्थिक मदत केली असून, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन पंढरीनाथ कांबळे, उपाध्यक्ष सारिका यशवंत सोनवणे, सुनील नागजी माळी आदी व मुख्याध्यापक सुरेश आनंदा कांबळे, उपशिक्षक अनिल तुकाराम गाडे, गौतम ज्ञानेश्वर जुगदार, केंद्र प्रमुख नीलिमा संजय कुलकर्णी आदींनी विशेष परिश्रम घेतले आहेत.
शिक्षणाच्या गोडीसाठी साकारली आगगाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2019 12:32 AM