सचिन सिंहवारजे : दिवाळीच्या सुट्टीत प्रवाशांच्या विशेष सोयीसाठी सुरू केलेली पुणे-गोरखपूर अनारक्षीत (जनरल) विशेष गाडी रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे सुमारे २८ तासापेक्षाही जास्त उशिराने पुण्यात पोहोचली. विशेष म्हणजे या गाडीवर पाटीही नसल्याने अगदीच नगण्य प्रवासी घेऊन जवळ जवळ मोकळीच धावत आहे. रेल्वे प्रशासनाने जारी केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे गाडी क्रं. ०१४५४ गोरखपूरहून पुण्यात बुधवारी संध्याकाळी पाच वाजता येणे अपेक्षित होते. पण ही गाडी गुरुवारी रात्री साडे नऊ वाजता पुण्यात आली. म्हणजे सुमारे २८ तासापेक्षाही जास्त उशीराने धावली आहे. यामुळे गाडी तील प्रवासी अशरश: वैतागले होते. अशाच प्रकारे पुण्यातून या गाडीची (०१४५३) सुटण्याची वेळ दर रविवारी संध्याकाळी ७.५० वाजता आहे. तरीही पुण्यातून सुटताना या गाडीला मागील दोन रविवारी अनुक्रमे साडे पाच तास (म्हणजेच सोमवारी मध्यरात्री १.२० वा.) व साडे सात तास (पहाटे ३.२०) असा उशीर झाला होता. ही गाडी विशेष गाडी असल्याने पुणे अथवा गोरखपूरहुन उशीरा सुटली तरी मधल्या प्रवासात हिचा वेग वाढवून किंवा थांब्यावर कमी वेळ थांबा घेऊन वेळेची बचत करता येणे शक्य आहे. पण प्रशासन नेमकी उलट भूमिका घेऊन मधल्या टप्प्यात गाडीस अजूनच उशीर करत आहे. काही महत्त्वाच्या स्थानकांमध्ये ही गाडी तास दोन थांबवून ठेवण्यात येऊन इतर गाड्या पुढे सोडण्यात येते. ही गाडी हॉलिडे स्पेशल असल्याने सापत्न वागणूक मिळत असल्याचे प्रवाशांचे मत आहे.
गाडीला नाही नावाची पाटीसर्व मेल एक्स्प्रेस व पॅसेंजर गाड्यांनाही गाडी कुठून कुठे धावते ही व गाडीला नाव असल्यास ते नाव व गाडी क्रमांक दर्शवणारी पाटी असते. निदान इंजिनच्या मागच्या डब्यात व सर्वात शेवटी गार्डच्या डब्याला तर अशी पाटी हमखास बघायला मिळते. पण या गाडीला अशी कोणतीच पाटी नाही. अशी माहिती या गाडीने प्रवास करणारे सुभाष गौड यांनी दिली. त्यामुळे पुणे-गोरखपूर दरम्यान मधली स्थानके असलेली दौंड, मनमाड, भुसावळ या महाराष्ट्रातील शहरांबरोबरच परराज्यातील खंडवा इटारसी, भोपाळ, झाशी, बिना लखनौ, कानपूर बस्ती अशा मधल्या स्थानकांवरील स्थानिक प्रवासी देखील या गाडीत चढत नाहीत. कारण गाडीत जागा असली तरी गाडी कुठून कुठे जाते हेच प्रवाशांना माहित नसते.
सर्वसामान्य डिजिटायझेशन पासून दूरच गाडी उशीरा धावत असल्याने व फक्त सुट्टीच्या हांगामापुरती असल्याने या गाडीची वेळ अनेकदा चौकशी खिडकीवरील कर्मचाºयांनादेखील माहित नसते. अशा वेळेस रेल्वेच्या नॅशनल ट्रेन एन्क्वायरी सिस्टम या वेबसाइटला भेट दिल्यास एखादी गाडी सध्या कुठे आहे याची इत्थंभूत माहिती मिळू शकते. पण फक्त स्मार्ट फोन चालवणारे किंवा सुशिक्षित नागरिकच याचा वापर करतात. त्यांनाही याची फारशी माहिती नसल्याचे समोर आले आहे. साधारणपणे रेल्वेचे सामान्य डब्यात कमी उत्पन्न असलेले नागरीक किंवा मजूर वर्ग प्रवासी म्हणून प्रवास करतात. यात काही ऐन वेळेस प्रवासाला निघणारे इतर उत्पन्न गटाचे नागरीकही असतात. पण त्यांची संख्या अशा लांबच्या प्रवासात अगदीच नगण्य आहे. असे मजूर वर्ग साधारणपणे अल्प किंवा अशिशिक्षित असल्याने त्यांचा रेल्वेच्या डिजिटायझेशन संक्ल्पनेशी फारसा संबध येत नाहीत. त्यामुळे वेबसाईटवर रेल्वेचे माग काढून व उशीरा धावणारी रेल्वे पकडणे हे त्यांना शक्यच नाही. त्यामुळे या गाडीची वाट बघत बसण्यापेक्षा व साधारण (जनरल) तिकीट कोणत्याही गाडीत चालत असल्याने ते या मार्गावर वेळेवर धावणाºया अन्य गाड्यांत प्रवास करतात. पारिणामी सीझनमध्ये रेग्युलर गाड्यांना प्रचंड गर्दी व अशा विशेष गाड्या मोकळ्या हे विरोधाभासी चित्र निर्माण होत आहे.
क्षमतेपेक्षा अत्यंत कमी प्रवासीइतर एक्स्प्रेसच्या स्लीपर डब्यात ७२ प्रवासी झोपून येतात. तसेच त्यांच्या जनरल डब्यात साधारण १०० ते १२५ प्रवासी बसून येऊ शकतात. दाटीवाटीने उभे राहिल्यास ही संख्या अजूनही वाढू शकते. या गाडीस २१ सर्वसाधारण डबे जोडले आहेत. त्यामुळे या गाडीत पूर्ण क्षमतेने प्रवासी बसल्यास २००० प्रवासी सहज प्रवास करू शकतात. पुण्यात गुरुवारी संध्याकाळी आलेल्या गाडीत फक्त ८० च्या आसपास प्रवासी होते. त्यातले काही प्रवासी कोपरगाव स्थानकात उतरून पुण्याकडे येणार्या या गाडीस ओवरटेक करणार्या झेलम एक्स. गाडीत आले. त्यामुळे क्षमतेच्या १० टक्के प्रवासी घेऊन जाणारी ही गाडी रेल्वे खात्यासही तोटा देणारीच आहे.
पुणे-वाराणसीला ही उशीरगोरखपूरहून आल्यावर हीच गाडी वाराणसी स्पेशल म्हणून गुरुवारी रात्री दहा वाजता सोडण्यात येते. म्हणजेच गोरखपूर गाडीचेच रेक (डबे) पुणे मंडूवाडीह (वाराणसी) सर्वसाधारण विशेष गाडी म्हणून धावते, गुरुवारी रात्री साडे नऊला आल्यावर तिला रात्री १० वाजता लगेच सोडणे शक्य नव्हते. कारण गाडी बाहेर गावीहून पुण्यात आल्यावर तीची साफ सफाई व सुरक्षा विषयक इतर तपासण्या करायला काही ठराविक वेळ द्यावा लागतो. त्यामुळे पुणे वाराणसी गाडी ट्रेन क्रं ०१४०३ तब्बल आठ तास उशीराने म्हणजेच शुक्रवारी सकाळी ६ वाजता पुण्याहून वाराणसीकडे प्रयाण केले. ही गाडीही वाराणसीला उशीरानेच पोहोचेल व परत परतीचा प्रवास उशीरानेच सुरू करून पुण्यात साधारण १५ ते २० तास उशीरा येण्याची शक्यता असल्याचे जाणकारांचे मत आहे.
अधियाकार्यांचेही दुर्लक्षविशेष म्हणजे रेल्वेचे अनेक अधिकारी कर्मचारीही अशा गाड्याने आसपासच्या स्थानकात प्रवास करत असतात त्यांनाही याबाबत काहीच माहिती नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मागच्या आठवड्यात आपणही अशाच गाडीने पुणे ते दौंड प्रवास केल्याचे रेल्वेचे अधिकारी मनोज झंवर यांनी 'लोकमत'शी बोलताना मान्य केले. पण रात्रीचा अंधार असल्याने आपण पाटीकडे फारसे लक्ष दिले नाही व आपल्याच डब्याला पाटी नसेल पुढे इंजिन जवळ व मागे गार्ड जवळ असेल असे वाटले, असे ते म्हणाले व याबाबत निश्चित उपायोजना करण्यात येणार असल्याचे त्यांनी मान्य केले.
गोरखपूर-पुणे ही गाडी गोरखपूनहून मंगळवारी सकाळी साडे वाजता सुटणे अपेक्षित असलेली गाडी त्याच दिवशी रात्री साडे दहा म्हणजे १५ तास उशीरा सुटली. लखनौपर्यंत गाडीचा वेग चांगला होता. तेथून पुढे झाशी व बिना स्थानकांच्या अलीकडे सिग्नलला सुमारे दोन दोन तास थांबवून ठेवण्यात आली. पुढच्या प्रवासातही गाडी स्टेशनवर न थांबवता सिग्नलला जास्त थांबवून व मागून येणाºया गाड्यांना पुढे पाठवण्यात येत होते. भुसावळ स्थानकात गुरुवारी पहाटे चार वाजता आली होती. तेथून पुढे इतर गाड्यांना पुण्यात येण्यास आठ तास लागतात. या गाडीला मात्र १६ तास लागले. आमच्या गाडीच्या मागे धावणारी जम्मू पुणे झेलम एक्स्प्रेस कोपरगाव स्थानकात आमच्यानंतर आली व पुढे निघून गेली. ती पुण्यात संध्याकाळी चारला पोहोचली देखील. आम्ही मात्र सात वाजले तरी गाडीतच अडकलो होतो. जनरल डबा असल्याने व प्रवासी कमी असल्याने विक्रेते ही या गाडीत फिरकत नाहीत. त्यामुळे पत्नी व लहान मुलांचे अन्न पाण्यावाचून हाल झाले. पण दाद कोणाकडे मागणार? - संजय गौड, प्रवासी
आरक्षण नसलेल्या ऐन वेळेस प्रवास करणाºयांसाठी ही गाडी चांगली आहे. बसायची चांगली सोय मिळाली. पण आधीच लांबचा व वाढलेला प्रवास व प्रचंड उशीर झाल्याने आमचे हाल झाले. प्रवासात काही डबे अगदीच मोकळे असल्याने व दोन रात्रीचा प्रवास असल्याने सुरक्षेबाबत साशंक होते. शेवटी आमच्या डब्यातील आम्ही सर्व १२-१५ प्रवाशांनी परस्पर सहमतीने रात्रीच्या वेळी डब्याचे सहाही दरवाजे आतून बंद करून कडी लाऊन घेतली.- रिना विश्वकर्मा, गोरखपूरहून पुण्यात आलेल्या प्रवासी
पुणे-गोरखपूर (०१४५३) ५४ एक्सप्रेस व १४०३-०४ पुणे-वाराणसी एक्स्प्रेस ही गाडी रेल्वेच्या सुमारे आठ दहा विभागातून जाते. त्यामुळे रेल्वेस उशीर होत असावा. गाडीस उशीर होत असल्याबद्दल रेल्वेच्या परिचालन विभागास माहिती कळवण्यात येईल. गाडीवर पाट्या नसल्याने नागरीकांची गैरसोय होत आहे हे मान्य असून त्याबाबत लवकरच विभागास कळवून नव्याने पाटी बसवण्याची प्रक्रिया करण्यात येईल. - मनोज झंवर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पुणे विभाग
भारतीय रेल्वेचे अनेक विभाग असले तरीही रेल्वे ही एकच आहे. रेल्वेचे अनेक विभाग हे रेल्वे सेवेत सुसूत्रता आणण्यासाठी करण्यात आले आहेत. त्यामुळे गाडीस उशीर होण्याचे हे काही कारण नाही. प्रत्येक गाडीस अप आणि डाउन क्रमांक व नावाची पाटी असायलाच हवी. रेल्वेचे पुणे विभाग हा नवसाला पावणारा असा झाला आहे. - हर्षा शहा, अध्यक्षा रेल्वे प्रवासी संघ
ही गाडी उशिरा धावत असल्याबद्दल आपल्याला आजच माहिती मिळाली असून लवकरच याबाबत रेल्वे अधिकाºयांशी चर्चा करू. शिवाय ही बाब रेल्वेमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देऊन त्यावर तत्काळ तोडग्याबाबत प्रयत्न करू. - अनिल शिरोळे, खासदार