नारायणगाव : परप्रांतीयांना मंचर येथे सोडण्यास नकार देणारया ट्रक चालकाला नारायणगाव पोलीस ठाण्यातील प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकाने अमानुषपणे काठीने मारहाण केली. या मारहाणीत ट्रक चालकाच्या उजव्या हाताचे एक बोट फ्रॅक्चर झाले असून अनेक ठिकाणी मारहाणीमुळे सूज आली आहे. दरम्यान, ट्रक चालकाला मारहाण केल्याचे तीव्र पडसाद नारायणगाव परिसरात उमटले आहेत. संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी अशी मागणी नारायणगाव येथील नागरिक , ट्रक व्यावसायिक आणि जगताप कुटुंबीयांकडून केली जात आहे.
दिनेश चंद्रकांत जगताप (रा. कोल्हे मळा , नारायणगाव ) असे मारहाण झालेला ट्रक चालकाचे नाव आहे. तर मारहाण करणारे पोलीस उपनिरीक्षक अभिजित पवार हे नारायणगाव पोलीस ठाण्यात प्रशिक्षणार्थी म्हणून कार्यरत आहेत . दरम्यान , पोलीस अधिकारी प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्याला वाचविण्याचा प्रयत्न सुरु आहे .
याबाबत अधिक माहिती अशी, ट्रक चालक दिनेश जगताप हे मंगळवारी मध्यरात्री रात्री संगमनेर येथून कोंबडीचे खत टाकून नारायणगावच्या दिशेने मालवाहतूक ट्रक घेऊन येत होते. कांदळी वडगाव हद्दीत आले असताना नारायणगाव पोलिसांनी त्यांची ट्रक थांबविली. यावेळी तेथे असलेले पोलीस उपनिरीक्षक अभिजित पवार यांनी ट्रकचालकाला सांगितले , मध्यप्रदेश मधल्या या ६० ते ७० नागरिकांना मंचर याठिकाणी सोड. यावर ट्रक चालक जगताप यांनी सांगितले,साहेब, मी सकाळपासून उपाशी आहे. मला झोपेची नितांत गरज आहे. माझी मालवाहतूक ट्रक आहे , माझ्या गाडीला प्रवासी वाहतूक परवाना नाही, मी ह्या नागरिकांना सोडू शकत नाही. असे म्हणताच अधिकारी पवार यांनी, तू पोलिसांचे म्हणणे ऐकत नाही. तुला पोलीस म्हणजे काय हे समजत नाही का ? असे चालक जगताप यास काठीने बेदम मारहाण करण्यास सुरवात केली.पोलीस अधिकारी पवार हे मारहाण करून थांबले नाही तर पोलीस कर्मचाऱ्यांना सांगून ट्रक पोलीस स्टेशनला आणण्यास भाग पाडले. जखमी अवस्थेत जगताप यांनी ट्रक गाडी पोलीस स्टेशनला घेऊन आले. ही घटना जगताप यांच्या कुटुंबियांना समजल्यावर ते पोलीस ठाण्यात आले नंतर पोलिसांनी जगताप यांना उपचारासाठी रात्री उशिरा सोडले.कोरोना पार्श्वभूमीवर पोलीस अधिकारी , कर्मचारी यांच्यावर कामाचा ताण आहे हे आपण समजू शकतो. त्यांच्या प्रती आदर देखील आहे , मात्र त्यांनी कुणालाही मारहाण करावी हे कदापि खपवून घेतले जाणार नाही. मारहाण करण्याबाबत आपण अधिकाऱ्यांना योग्य ती समज व सूचना दिल्या आहेत, अशी प्रतिक्रिया खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली .