पुण्यातले भाजपचे नगरसेवक निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. आजपासून नगरसेवकांचे दोन दिवसांचे प्रशिक्षण रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये सुरु झाले आहे. यामध्ये नगरसेवकांना संघाच्या शिस्तीपासून ते अर्थसंकल्पापर्यंत अनेक बाबतीत प्रशिक्षण दिलं जाणार आहे. पुणे महापालिकेच्या निवडणुकीला आता एक वर्ष शिल्लक राहिले आहे. गेल्यावेळी भाजपने निवडणुकीत जवळपास सेंच्युरी मारत एकहाती सत्ता मिळवली होती. गेल्या वर्षी अनेक महत्वकांक्षी प्रकल्प मार्गी लावण्याची तयारी भाजप नगरसेवकांनी केली असली तरी कोरोनामुळे या सगळ्या प्रकल्पांसाठी यंदा तरतूद आणि पाठपुरावा करण्याची वेळ भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांवर आली आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजप नेते यंदा लवकरच निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.प्रदेशाध्यक्षच पुण्यात असल्याने यंदा गेल्या निवडणुकांच्या तोडीस तोड कामगिरी करण्याची तयारी भाजपकडून करण्यात येत आहे. यापूर्वी पुण्यात काही कार्यक्रम घेतले गेले तरी आजच्या प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून निवडणुकीच्या तयारीला अधिकृतरित्या सुरुवात झाली आहे. आज दुपारी साडेतीन वाजता भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या शिबिराचे उद्धाटन झाले. त्यांनी पक्षाची धोरणं आणि पुढची दिशा याबाबत नगरसेवकांना मार्गदर्शन केलं. त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ-आणि भाजप याबाबत नगरसेवकांना मार्गदर्शन करण्यात आले. तर तिसऱ्या सत्रात अर्थसंकल्पाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विशेष म्हणजे दोन दिवसांच्या या शिबिरासाठी पुण्यातुन सगळे नगरसेवक बसवे एकत्र रवाना झाले. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सेल्फी देखील पोस्ट केला. गेल्या काही दिवसांपासून भाजपचे काही नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. त्यामुळे एकत्र प्रवास करत आणि फोटो टाकत हम सब एक है चा संदेश भाजप कडुन देण्याच्या प्रयत्न केला जातोय का अशी चर्चा सध्या रंगली आहे.
महापालिकेतील सत्ता राखण्याचं आव्हान; पुण्यात भाजप नगरसेवकांच्या प्रशिक्षणाला सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2021 6:21 PM