पुणे : अपघातानंतर त्यातील जखमींना त्वरित आवश्यक उपचार केले, तर अनेकांचे प्राण वाचतील, त्यासाठी किमान १ लाख जणांना अशा प्राथमिक उपचाराचे प्रशिक्षण देण्याचा विचार डॉ. नरेंद्र वैद्य यांनी जाहीर केला.
डॉ. वैद्य म्हणाले की, आजही दर मिनिटाला एक अपघात होतो, दर चार मिनिटाला एक मृत्यू होतो. वृत्तपत्र वाचनाची सुरूवातच अपघाताच्या व त्यात ठार झालेल्यांच्या बातमीने होते. अनेक अपघातात जखमींना वेळेवर वैद्यकीय मदत मिळाली नाही म्हणून प्राण गमवावे लागतात. यात बदल करायचा असेल तर रस्त्यावरच्या प्रत्येकाला अशा वेळी काय करायला हवे याची माहिती हवी. त्यामुळेच याप्रकारचे प्रशिक्षण गरजेचे आहे. किमान १ लाख पुणेकरांना हे प्रशिक्षण हॉस्पिटलच्या माध्यमातून देणार आहे.
जंजिरा वेलफेअर फौंडेशन, जेरीवेल यासाठी हॉस्पिटलला सहकार्य करणार आहे. लोकमान्य हॉस्पिटमध्ये मंगळवारी दुपारी झालेल्या यासाठीच्या कार्यक्रमाला आमदार सिद्धार्थ शिरोळे, नगरसेवक आदित्य माळवे, वाहतूक विभागाचे उपपरिवहन अधिकारी संजय ससाणे, महापालिका उपायुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, डॉ. सुकुमार सरदेशमुख, अनिल पंतोजी, रिक्षा संघटनेचे बाबा कांबळे, पत्रकार प्रसाद कुलकर्णी उपस्थित होते.
आमदार शिरोळे, बाबा कांबळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांची भाषणे झाली. डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी प्रास्ताविक केले. कॅप्टन हेमंत कुलकर्णी यांनी आभार मानले.