लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनावर येऊ घातलेल्या लस नागरिकांना कशारितीने द्यायच्या़ याकरिता सोमवारी पुणे महापालिकेच्या डॉक्टरांना प्रशिक्षण दिले़ पहिल्या टप्प्यात ही लस आरोग्य क्षेत्रातील सेवकांना देण्यात येणार आहे. पुणे शहरात आतापर्यंत या लसीकरणासाठी आरोग्य क्षेत्रातील सुमारे ४८ हजार जणांची नोंदणी झालेली आहे.
कोव्हिड-१९ ला प्रतिबंध घालणाऱ्या लसींचे उत्पादन आजमितीला जगभरात होत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर रशियाच्या स्पुटनिक आणि अमेरिकेच्या फायजर कंपनीच्या लसींचे टेस्टिंग पुर्ण झाले असून, त्या देशांमध्ये आपत्कालीन परिस्थितीत लसीकरणास सुरूवातही केली आहे. भारतातही पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये कोव्हिशिल्ड या लसीच्या चाचण्याही पूर्ण झाल्या असून, भारत बायोटेकच्या लसीच्या चाचण्याही अंतिम टप्प्यात आहेत. या कंपन्यांनीही आपात्कालीन परिस्थितीत लसीकरणाची परवानगी मागितली आहे. येत्या काही आठवड्यात लसीकरणाला सुरूवातही होण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान, या लसीचे उत्पादन, त्या साठविणे आणि वाहतुकीसाठी कोल्ड स्टोअरेज यासोबतच लसीकरणाची सुरूवात कोणत्या घटकापासून करायची याची देखील एसओपी महापालिका स्तरावर ठरविली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात आरोग्य क्षेत्रात काम करणारे डॉक्टर्स, नर्सेस, प्रयोग शाळेतील तज्ज्ञ, मदतनीस, वैद्यक क्षेत्र आणि औषधांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या घटकांना लस देण्यात येणार आहे. यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर या घटकात काम करणाऱ्यांची नोंदणीही केली आहे.
--
लसीकरणाची मोहीम वेगाने करण्यासाठी प्रशिक्षण महत्वाचे
महापालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरात आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या सुमारे ४८ हजार जणांची नोंदणी केली आहे. त्यांना प्रथम या लस देणार आहे. लस साठविण्यासाठी कोल्डस्टोअरेज, वाहतूक याचे नियोजन करून लसीकरण मोहीम राबविणार आहे. यासाठी आज महापालिकेच्या डॉक्टरांना लसीकरणाबाबत प्रशिक्षण दिले आहे. लसीकरणाची मोहीम वेगाने करण्यासाठी हे प्रशिक्षण महत्वाचे ठरणारे आहे.