पुणे : मानवी जीवनाच्या सर्व अंगांना व्यापणारा जादूटोणाविरोधी कायदा जगातला पहिला अंधश्रद्धाविरोधी कायदा आहे. महाराष्ट्राला वारकरी संप्रदायासह पुरोगामी विचार लाभलेले आहेत; त्यामुळेच राज्यामध्ये हा कायदा संमत होऊ शकला, असे मत अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक प्रा. श्याम मानव यांनी व्यक्त केले.जादूटोणाविरोधी कायद्याचे ज्ञान पोलिसांनाही व्हावे, याकरिता पोलीस आयुक्तालयामध्ये एकदिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आर्थिक आणि सायबर गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त (गुन्हे) सी. एच. वाकडे, उपायुक्त (गुन्हे) पी. आर. पाटील, उपायुक्त (आर्थिक व सायबर) दीपक साकोरे, सहायक आयुक्त राजेंद्र जोशी, राम मांडुरके, किशोर नाईक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत नवले, अनिल पाटील, एस. बी. निकम, मुजावर, जी. डी. पिंगळे, सुनील यादव आदी अधिकारी उपस्थित होते. प्रा. मानव म्हणाले, ‘‘छत्तीसगढ, बिहार आणि ओडिशा या तीन राज्यांत संमत करण्यात आलेला अंधश्रद्धाविरोधी कायदा तकलादू आहे. बिहारमध्ये तर केवळ जादूटोण्याच्या संशयाने मारहाण झाल्यासच कारवाई केली जाते; परंतु राज्यातील जादूटोणा विरोधीकायदा हा सर्व प्रकारच्या अंधश्रद्धांना सामावून घेणारा व त्यावर कारवाईची व्याख्या देणारा आहे. हा कायदा लागू झाल्यापासून २०० पेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद राज्यभर झालेली आहे. जादूटोणाविरोधी कायद्याच्या जनजागृती, प्रचार आणि प्रसारासाठी सामाजिक न्याय व विशेष साह्य विभागाच्या समाजकल्याण आयुक्तालयाच्या अंमलबजावणी समितीची स्थापना करण्यात आली आहे. समितीच्या माध्यमातून सर्व जिल्ह्यांमधून जगजागृती करण्यात आली आहे. यासोबतच राज्यातील सर्व पोलीस ठाणी, ठाणेअंमलदार, निरीक्षकांनाही कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशिक्षण देण्यात आलेले असल्याचे मानव यांनी सांगितले.
पोलिसांना अंनिसचे प्रशिक्षण
By admin | Published: December 01, 2015 3:43 AM