पुणे : पुणे- ग्रामीण भागातील कुटुंबांना घरगुती कार्यान्वित नळ जोडणीद्वारे पाणी पुरवठा करण्यासासाठी जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत गाव कृती आराखडा तयार करण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ, इंदापूर, दौंड, भोर, वेल्हा या तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक व इतर प्रतिनिधी ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले. उर्वरित तालुक्यांना उद्या शुक्रवारी प्रशिक्षण दिले जाणार आहे, असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी दिली.
जलजीवन मिशनच्या कामासाठी गाव पातळीवरील गाव कृती आराखडा तयार करण्याच्या अनुषंगाने लागणारी माहिती कोबो टूल साधनाचा वापर करून संकलन करण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्हा स्तरावर सर्व गावांची गाव कृती आराखड्याची माहिती संकलीत करून गाव कृती आराखडा तयार केला जाणार आहे.
५ ते ७ ऑगस्ट या कालावधीत तालुकास्तरावर आराखड्यांची पडताळणी करून आवश्यक त्या सुधारणा करून नवे आराखडे १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ग्रामसभेत वाचन व मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे. गाव कृती आराखडा अभियान यशस्वीरित्या राबविण्याचे आवाहन पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद टोणपे व ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्रकुमार कदम यांनी केले आहे.
कोट
ग्रामीण भागातील पाणीपुरवठा करण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत गाव पातळीवरील वैयक्तिक नळ जोडणीसाठी आराखडा तयार होईल. त्यासाठी गाव पातळीवरील सर्वांनी सहभाग घ्यावा असे, आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी केले आहे.