पुणे : राजकीय पक्ष ही व्यक्तींची नाही, तर विचारांची लढाई असते, हे आपण विसरत चाललो आहोत. धनंजय थोरात हे सगळ्यांशी एकरुप होणारे आणि कार्यकर्ता कसा असावा, हे सांगणारे दिलखुलास व्यक्तिमत्त्व होते. सध्या पक्षांतर्गत राजकीय अस्थिरता वाढत असून कार्यकर्ता कसा असावा, याचे प्रत्येक पक्षामध्ये प्रशिक्षण देण्याची गरज निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले.
धनंजय थोरात स्मृती प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा धनंजय थोरात आदर्श कार्यकर्ता पुरस्कार वितरण सोहळा एस.एम.जोशी सभागृहात पार पडला. यावेळी ज्येष्ठ संगीतकार पं. ह्रदयनाथ मंगेशकर, माजी आमदार मोहन जोशी, उल्हास पवार, रामदास फुटाणे, शिरीष बोधनी, बिपीन गुपचुप, डॉ.विकास आबनावे, धनंजय थोरात यांच्या पत्नी शुभांगी थोरात यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. अहमदनगर जिल्हयातील डॉ.राजेंद्र धामणे आणि डॉ.सुचेता धामणे यांना मुख्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. अरुण काकतकर, समाजसेवक प्रदीप लोखंडे, सामाजिक कार्यकर्ते शिरीष मोहिते यांना देखील सन्मानित करण्यात आले. अरुण काकतकर यांनी पुरस्काराची रक्कम डॉ.धामणे यांच्या संस्थेला आणि शिरीष मोहिते यांनी लुई ब्रेल अंध अपंग संस्थेला दिली.
ह्रदयनाथ मंगेशकर म्हणाले, ‘धनंजय थोरात काँग्रेसचे होते आणि नगरसेवक होते हे मला ठाऊक नव्हते. पण, ‘भावसरगम’चे चाहते म्हणून माझा त्यांच्याशी परिचय होता. करवीर पीठाच्या शंकराचार्यांनी लतादीदीला स्वरमाऊली ही पदवी दिली आहे. या स्वरमाऊलीच्या वाढदिवसानिमित्त मी माऊली प्रतिष्ठानला एक लाख रुपयांची देणगी जाहीर करतो.’
मोहन जोशी म्हणाले, समाजात अनेक कार्यकर्ते आहेत, ज्यांच्या कामाची दखल घेतली जात नाही. समाजामध्ये त्यांना व्यासपीठ दिले गेले नाही, अशांची निवड प्रतिष्ठानतर्फे केली जाते. त्यांचे काम समाजापर्यंत पोहोचवून त्यातून समाजात प्रेरणा निर्माण व्हावी, हा त्यामागील हेतू आहे, असेही त्यांनी सांगितले.
बालचित्रवाणीतील ठेवा डिजीटाईज करा बंद पडलेले दुकान असे म्हणून जी बालचित्रवाणी बंद झाली. त्याकरीता मी अनेकदा पत्रव्यवहार देखील केला आहे. बंद पडलेल्या या दुकानात कोण कोण होते, त्या ५०० लोकांची यादी देखील मी बालभारतीकडे दिली आहे. त्यात तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे देखील आहेत. ते चित्रीकरण ताबडतोब डिजीटाईज करा. जेणेकरुन हा सांस्कृतिक अमूल्य ठेवा पुढच्या पिढीसमोर ठेवता येईल, अशी मागणी अरुण काकतकर यांनी गिरीष बापट यांच्याकडे केली.