पुण्यात गव्याची सुटका करण्याच्या प्रयत्नात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. आत्तापर्यंत अनेक वेळा गवा, बिबट्या इत्यादी वन्य प्राण्यांना मानवी वस्तीत आल्यामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्या निमित्ताने ''''वन्य प्राण्यांचा होणारा नागरी वस्तीत प्रवेश व सामान्य नागरिकांची काय भूमिका असावी'''' ह्या विषयावर वाईल्ड संस्थेने आज पुण्यात चर्चा सत्राचे आयोजन केले होते. 27 डिसेंबर रोजी झालेल्या या कार्यक्रमात वाईल्ड संघटनेचे अध्यक्ष शेखर नानजकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले व संघटनेच्या पुढील कार्यप्रणाली विषयी माहिती दिली.
एखादा वन्यजीव मानवी वस्तीत आल्यास, त्या प्राण्याच्या सुरक्षित सुटकेसाठी काय प्रयत्न करता येईल तसेच संबंधित खात्याचे तज्ज्ञ व अधिकारी वर्ग येईपर्यंत होणारा गोंधळ व गडबड टाळण्यासाठी, समन्वय साधून काम करणारा नागरिकांचा एक वर्ग तयार होण्याची गरज असल्याचे नानजकर यांनी सांगितले. याच विषयाला अनुसरून वाईल्ड संघटना वन्यजीव प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करणार आहे.
संस्थेचे अमित पत्की यांनी सुत्रसंचालन केले तर निलेश खैरे यांनी आभार मानले.
-----------
दरमहा घेणार कार्यशाळा
येत्या 10 जानेवारी पासून दरमहा या एकदिवसीय कार्यशाळा सुरू होणार असल्याचे संस्थेचे वन्यजीव सुटका सल्लागर सागर जाधव यांनी सांगितले. या कार्यशाळेत लोकांना वन्यजीवना विषयी माहिती दिली जाईल, तसेच प्राण्यांचा नागरी भागात प्रवेश झाल्यावर त्याला पुन्हा निसर्गात सुरक्षित सोडण्यासाठी काय करता येईल या विषयावर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. निसर्ग व पर्यावरणाची आवड असणाऱ्या कोणालाही ह्या कार्यशाळेत सहभागी होता येईल.