पुणे: हिवाळ्यात पडणाऱ्या दाट धुक्यामुळे रेल्वेच्या वेगावर मर्यादा येतो. वेगमर्यादा कमी झाल्यामुळे रेल्वेच्या नियोजित वेळेवर परिणाम होतो. काही वेळा गाड्या उशिरा धावतात. मात्र, नवीन धुके सुरक्षा उपकरणाद्वारे (फॉग पास डिव्हाइस) हा अडथळा दूर होणार असून, कमी दृश्यमानता असली, तरी लोकोपायलटला साधारण ५०० मीटरपर्यंतची सिग्नलची स्थिती समजणार आहे. पुणे विभागातील ८० इंजिनमध्ये फॉग पास डिव्हाईस उपकरणे बसवले आहेत. त्यामुळे धुक्यातही रेल्वेगाड्या सुरळीत धावतील.
रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांना हिवाळ्यात अनेक वेळा धुक्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते. दाट धुक्याचा थेट गाड्यांच्या वेगावर परिणाम होतो. त्यामुळे गाड्यांना अनेक तास उशीर होतो. त्यामुळे मध्य रेल्वे विभागाकडून पुणे विभागाला फॉग पास डिव्हाईसच्या ८० उपकरणे दिली आहेत. त्यामुळे कमी दृश्यमानता असली तरी लोकोपायलटला साधारण पाचशे मीटरपर्यंतची सिग्नलची स्थिती समजणार आहे. हिवाळ्यात पडणाऱ्या दाट धुक्यामुळे अनेक वेळा रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होते. परिणामी गाड्यांचा वेग कमी करावा लागतो. पण, त्यासाठी रेल्वेकडून फॉग पास डिव्हाईस हे उपकरण तयार करण्यात आले आहे. ते प्रत्येक रेल्वे विभागाला देण्यात आले आहे. धुक्याच्या वेळी हे उपकरण रेल्वे इंजिनमध्ये ठेवण्यात येते. हे उपकरण ‘जीपीएस’ प्रणालीनुसार चालते. धुक्यात चालकांना सिग्नल दिसण्यात या उपकरणामुळे मदत होते. कर्मचारी असलेली आणि नसलेली रेल्वेची फाटके, वेगावर कायमस्वरूपी निर्बंध असलेले विभाग आदींबाबतची माहितीही रेल्वे चालकांना ५०० मीटर आधी उपकरणावर दिसते. त्यामुळे गाडीच्या वेगाबाबत विचार करता येतो. उत्तर भारतामध्ये हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात दाट धुके पडते. त्यामुळे त्या गाड्यांच्या वेळापत्रकावर जास्त परिणाम होते. त्यामुळे या गाड्यांमध्ये प्रामुख्याने हे उपकरण बसविण्यात आले आहे. त्याचा फायदा प्रवाशांना होत आहे. तसेच, सुरक्षेबाबतीत देखील हे उपकरण फायद्याचे ठरत आहे.
दाट धुक्यातही रेल्वे धावणार सुसाट
धुके सुरक्षा उपकरणाचा असा होतो उपयोग
- 'जीपीएस' तंत्रज्ञानामुळे रेल्वे ट्रॅक नकाशा, सिग्नल, स्थानके आणि रेल्वे क्रॉसिंगची माहिती मिळू शकते.
-गाडी धावताना लोको पायलटला लेव्हल क्रॉसिंग आणि सिग्नल्सची माहिती देत असते.
-गाडी चालविताना जेव्हा लोको पायलटला या यंत्रावरून ट्रॅकवर कोणतीही समस्या आहे की नाही, त्यानुसार गाडी नियंत्रित करू शकतो किंवा वेग वाढवू शकतो.
-हे उपकरण 'जीपीएस' तंत्रज्ञानावर चालते, त्यामुळे लोको पायलट पुढील तीन सिग्नल्सबाबत ऑडिओ आणि व्हिज्युअल संकेतांद्वारे सूचना देते.
- फॉग डिव्हाइस उपकरण आकाराने लहान असून, उपकरणाचे वजन फक्त दीड किलो.
- गाडीचा वेग ताशी १४० ते १६० किलोमीटर असला तरी यंत्रणा सुरळीत.
- मेल, एक्स्प्रेस, सुपरफास्टसह डेमू, मेमू, ईएमयू आदी गाड्यांमध्ये चालते.
- १८ तासांचा ‘बॅटरी बॅकअप’.
विभागनिहाय आकडेवारी...
पुणे विभाग : ८०मुंबई विभाग : १२०
भुसावळ विभाग : १००नागपूर विभाग : १२०
सोलापूर विभाग : ८०
हिवाळ्यात दाट धुक्यामुळे रेल्वे गाड्यांचा वेग कमी करावा लागतो. धुके सुरक्षा उपकरणांमुळे जीपीएसद्वारे सिग्नल, लेव्हल क्रॉसिंगची माहिती लोको पायलटला मिळणार आहे. त्यामुळे सुरक्षित आणि वेगवान प्रवास होणार आहे. सध्या पुणे विभागात ८० इंजिनमध्ये बसविण्यात आले आहे. - रामपाल बडपग्गा, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे