वाघोली येथील प्रकार
लोकमत न्यूज नेटवर्क
आव्हाळवाडी : पीएमआरडीएच्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे बांधकाम थांबविण्याचे पुनर्निदेश पीएमआरडीए उपमहानगर नियोजनकार यांनी बांधकाम व्यावसायिकाला दिले असतानाही बांधकाम व्यावसायिकाने बांधकाम सुरूच ठेवून पीएमआरडीएच्या आदेशाला केराची टोपली दाखविल्याचा प्रकार वाघोली येथे घडला आहे.
आदेशानंतरही या ठिकाणी सुरू असलेल्या बांधकामाची तक्रार करूनही पीएमआरडीए कारवाई करण्यास दिरंगाई करीत असल्याचा आरोप स्थानिक जागा मालकाने केला आहे.
याबाबत माहिती अशी की, वाघोली-भावडी रस्त्यालगत असणाऱ्या डिफेन्स कॉलनी फेज ४ साठी पोहच रस्त्याच्या वादातून पीएमआरडीए कार्यालयात हरिश्चंद्र पांडुरंग सातव यांनी डिफेन्स कॉलनी फेज ४ तर्फे नारायण प्रभाकर अंकुशे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. यानुसार पोहच रस्त्याचे स्थान निश्चित करण्यासाठी पीएमआरडीएने ८ जानेवारी रोजी वादांकित गट नंबर ६३ व लगतचे गट नंबर १, ५८, ५९ यांची संयुक्त मोजणी करून मोजणी नकाशा सादर करण्याचे लेखी आदेश देण्यात आले होते. या मिळकतीमध्ये त्रयस्त हितसंबंध होणार नाही असे आदेशात नमूद करण्यात आले होते. मात्र, या मिळकतीमध्ये त्रयस्त हितसंबंध निर्माण करून करारनामे केल्याचे आढळून आल्याने या जागेवरील बांधकाम तत्काळ थांबविण्याचे आदेश उपमहानगर नियोजनकार यांनी दिले होते. अशा परिस्थितीतही बांधकाम डिफेन्स कॉलनी फेज ४ बांधकाम व्यावसायिकाने पीएमआरडीएच्या आदेशाला केराची टोपली दाखविली बिनदिक्कतपणे काम सुरू ठेवले आहे. काम सुरू झाल्याची तक्रार पुराव्यासह पीएमआरडीएकडे केली असतानाही कोणतीही कारवाई केली नाही.
डिफेन्स कॉलनी सहकारी गृहरचना संस्था मर्यादित फेज ४ बाबत संबधिताकडे बांधकाम सुरू ठेवणेबाबतचे न्यायालयाचे आदेश असतील तर पीएमआरडीएकडे सुनावणी का चालू आहे? अशा प्रश्न निर्माण होत आहे. पुढील सुनावणीत याप्रकरणी निर्णय कळेल असे पीएमआरडीए अधिकारी यांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे बांधकाम सुरू ठेवण्याचे न्यायालयाचे आदेश असल्याचे बांधकाम व्यावसायिकाने सांगितले. पीएमआरडीएचे अधिकारी व बांधकाम व्यावसायिक यांच्या विधानामध्ये विसंगती दिसून येत असल्यामुळे साशंकता निर्माण होत आहे.
संबधित पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी वाघोलीतील स्थानिक हरिश्चंद्र सातव यांनी केली आहे.
कोट
काम थांबविण्यात येऊ नये असे न्यायालयाचा आदेश आहे. याबाबत पीएमआरडीएला लेखी म्हणणे सादर केलेले आहे.
- नारायण अंकुशे (डिफेन्स कॉलनी स. गृ. सं)
कोट
मोजणी नकाशाचा विषय असल्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात कार्यवाही केली आहे. कोणाच्याही बाजूने निर्णय दिलेला नाही. बांधकाम थांबविण्याचा व तत्सम बाबतीचा निर्णय पुढील सुनावणीत कळेल.
- विवेक खरवडकर (पीएमआरडीए)