पुणे : बंद असलेल्या सीपीआय या माओवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या पाच संशयितांना दुस-या कारागृहात हलविण्यात यावे, या मागणीसाठी येरवडा जेल प्रशासनाने केलेल्या अर्जावर गुरुवारी (६ सप्टेंबर) सुनावणी होणार आहे.
भिमा-कोरेगाव दंगल व एल्गार परिषदेच्या अनुषंगाने माओवाद्यांशी संपर्क असल्याच्या आरोपावरून जून महिन्यात सुधिर ढवळे, सुरेंद्र गडलिंग, शोमा सेन, महेश राऊत, रोना विल्सन यांना अटक करण्यात आली आहे. पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. मात्र येरवडा येथील कारागृहात सध्या क्षमतेपेक्षा जास्त कैदी आहेत. माओवाद्यांची संपर्क असल्याच्या आरोप असलेल्यांना या ठिकाणी ठेवल्यास ते इतर कैद्यांना त्यांच्या संघटनेमध्ये सहभागी करून घेवू शकतात, त्यामुळे त्यांना कोल्हापूर, नाशिक किंवा औरंगाबाद येथील कारागृहात ठेवण्यात यावे, असा अर्ज येरवडा कारागृह प्रशासानाने २१ जुलै रोजी काेर्टात केला होता.
जेलची क्षमता ही २ हजार ४४९ कैदी ठेवण्याची आहे. असे असतानाही सध्या विविध गुन्ह्यांतील ५ हजार ५०० पेक्षा अधिक कैदी याठिकाणी आहेत. संशयीत आरोपी हे येथील कैद्यांना बंदी असलेल्या संघटनेमध्ये सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न करू शकतात. त्यातून कारागृहात सुरक्षेचा प्रश्न निर्माण होवू शकतो, असे प्रशासनाने दिलेल्या अर्जात नमूद करण्यात आले आहे.