पुणे : विश्रामबागवाडा ही सुमारे दोनशे वर्षांपूर्वीची ऐतिहासिक वास्तू आहे. या वास्तूची झालेली झीज आणि कमकुवतपणा विचारात घेता संभाव्य धोका टाळण्यासाठी या ग्रंथालयाचे तातडीने स्थलांतर करणे आवश्यक होते. त्यासाठी शनिवार पेठेतील महापालिकेची न. वि. गाडगीळ शाळा ही नाममात्र भाडे करारावर देण्याबाबत विनंती करण्यात आली होती. शासकीय विभागीय ग्रंथालयाचे स्थलांतर न. वि. गाडगीळ शाळेच्या इमारतीमध्ये करण्याच्या प्रस्तावाला महापालिकेच्या स्थायी समितीने दोन वर्षांपूर्वी मान्यता दिली होती. मात्र, त्यानंतर विविध कारणांमुळे स्थलांतर रखडले होते. मात्र, आता गाडगीळ शाळेतील बारा वर्गखोल्यांचा ताबा ग्रंथालयाकडे मिळाला आहे. त्यामुळे ग्रंथालयाचे स्थलांतर होण्याच्या दृष्टीने पाऊल पडले असल्याची माहिती पुणे विभागाचे सहायक ग्रंथालय संचालक दत्तात्रय क्षीरसागर यांनी दिली.
सदाशिव पेठेमध्ये असलेल्या या ग्रंथालयाचे शनिवार पेठेमध्ये स्थलांतर होत असले, तरी ते कसबा विधानसभा मतदारसंघातच राहणार आहे. स्थलांतराच्या पहिल्या टप्प्यामध्ये शासकीय ग्रंथालयाचा ग्रंथ देवघेव विभाग पहिल्या न. वि. गाडगीळ शाळेत कार्यरत करण्यात येणार आहे. त्यासाठी ग्रंथालयाकडे असलेल्या साडेतीन लाख पुस्तकांपैकी दोन लाख पुस्तके वाचकांच्या सोयीसाठी गाडगीळ शाळेमध्ये हलविण्यात येणार आहेत. पुस्तकांबरोबरच फर्निचर हलविण्यासाठी निविदा काढण्यात येणार असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले.
शासकीय विभागीय ग्रंथालयाची सभासद संख्या साडेबारा हजार इतकी आहे. त्यापैकी सभासदत्वाचे नूतनीकरण करावयाचे राहून गेले अशी संख्या अडीच हजाराच्या घरात असू शकेल. दररोज तीनशे वाचक पुस्तक बदलण्याच्यानिमित्ताने ग्रंथालयाला भेट देतात. मात्र, शनिपार चौकातील गर्दी आणि वाहतुकीची वर्दळ ध्यानात घेता विश्रामबागवाडा येथील शासकीय ग्रंथालयात पुस्तक बदलण्यासाठी येणाºया सभासदांना सध्या वाहन दूर लावूनच यावे लागते. मात्र, गाडगीळ शाळेमध्ये ग्रंथ देवघेव विभागाचे स्थलांतर झाल्यानंतर वाचक दुचाकी ग्रंथालयापर्यंत घेऊन येऊ शकतील, याकडे क्षीरसागर यांनी लक्ष वेधले.
............
ग्रंथालयाचा इतिहास
विश्रामबागवाडा येथे असलेले हे महाराष्ट्र प्रादेशिक ग्रंथालय १९४८ ते १९६९ या कालावधीत महापालिकेकडून चालविले जात होते. १९६७ मध्ये राज्य सरकारने महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय अधिनियम संमत केला. त्यातील तरतुदीनुसार विभागीय ग्रंथालयाची स्थापना करण्यासाठी १९६९ मध्ये पुणे महापालिकेकडे असलेले विश्रामबागवाडा येथील ग्रंथालयाचे हस्तांतरण करून त्याचे शासकीय विभागीय ग्रंथालय असे नामकरण करण्यात आले.
.......