पुणे :पुणे वाहतूक शाखेच्या पोलिस उपनिरीक्षकाने एका तरुणाकडून पायाची मसाज करून घेत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर आता त्या उपनिरीक्षकाची पोलिस नियंत्रण कक्षात बदली केली असून, त्याला ५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेचा एक उपनिरीक्षक एका तरुणाकडून पायाची मसाज करून घेत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. चौकशीनंतर त्या उपनिरीक्षकाची पोलिस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली असून, त्याला ५ हजार रुपयांचा दंडसुद्धा ठोठावण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.
कल्याणी नगरमध्ये शनिवारी (दि. १) रात्री वाहनचालकांच्या कागदपत्रांची तपासणी करत होते. त्यावेळी एका कारमधून सणसवाडीचे तरुण निघाले होते. पोलिसांनी कागदपत्रे नसल्याने कारचालकाला दंड ठोठावला. त्यानंतर नाकाबंदी दरम्यान उपस्थित कर्मचारी तरुणाला घेऊन काही अंतरावर खुर्चीत बसलेल्या अधिकाऱ्याकडे घेऊन गेला. त्या पोलिस उपनिरीक्षकाने तरुणाची कानउघाडणी केली आणि त्याला पाय चेपायला सांगितले. कारवाईच्या भीतीमुळे त्याने पाय चेपून दिले. याची चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर या उपनिरीक्षकाची बदली करण्यात आली.