पुणे : संगणकीय बदली प्रक्रियेचे संकेतस्थळ सातत्याने हँग होत असल्याने राज्यातील जिल्हा परिषद शिक्षक हवालदिल झाले आहेत. सोमवारी आॅनलाईन अर्जाचा अखेरचा दिवस असल्याने दिवाळीतही अनेक शिक्षकांनी रात्र-रात्र जागून अर्ज भरण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही शिक्षकांची ‘अडथळ्यांची शर्यत’ संपलेली नाही. दरम्यान, ग्रामविकास विभागाने अर्ज भरण्याची मुदत वाढविल्याने शिक्षकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.राज्य शासनाने जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी यावर्षी आॅनलाईन पध्दत सुरू केली आहे. त्यासाठी स्वतंत्र संगणक प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या प्रक्रियेत आॅनलाईन अर्ज केल्यानंतरच संबंधित शिक्षक बदलीसाठी पात्र ठरू शकणार आहेत. त्यामुळे सध्या राज्यातील सर्व जिल्हा परिषद शिक्षकांची बदलीसाठी धावाधाव सुरू आहे. बदली पात्र शिक्षकांचे आधीच चार संवर्ग तयार करण्यात आल्याने संदिग्धता निर्माण झाली आहे. संवर्ग चारमधील शिक्षकांना आॅनलाईन अर्जासाठी दि. २३ आॅक्टोबरपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र, या मुदतीत अनेक शिक्षकांना आॅनलाईन अर्ज करता आलेला नाही.संकेतस्थळ सातत्याने हँग होणे, माहिती भरत असताना अचानक मुख्य पोर्टवर जाणे, काही टॅब सुरू न होणे, लॉग इन न होणे अशा अनेक अडचणींना शिक्षक सामोरे जात आहेत. त्यामुळे पात्र शिक्षकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, शिक्षकांच्या तक्रारी विचारात घेवून ग्रामविकास विभागाने अर्ज भरण्याची मुदत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महसुल विभागानिहाय सुधारित वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. औरंगाबाद विभागात दि. २४ व पुणे विभागात २५ आॅक्टोबरपर्यंत सकाळी अकरा वाजेपर्यंत अर्ज भरता येईल. तर नाशिक विभागात दि. २५ व २६ आॅक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली आहे. अमरावती, नागपूर व कोकण विभागात दि. २६ ते २८ आॅक्टोबरदरम्यान सकाळी अकरा वाजेपर्यंत मुदत असेल. या वेळापत्रकात कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे. या कालावधीत तरी संकेतस्थळ व्यवस्थितपणे सुरू राहणार की नाही, अशी भीती शिक्षकांनी व्यक्त केली आहे.
संवर्ग एक व दोन मधील शिक्षकांच्या बदल्या शासनस्तरावर करण्यात आल्या आहेत. सध्या संवर्ग ३ व ४ मधील शिक्षकांच्या बदल्यांसाठी आॅनलाईन अर्ज भरले जात आहेत. तांत्रिक अडचणींमुळे अर्ज भरण्याची मुदत वाढविण्यात आली. आतापर्यंत जिल्ह्यात किती शिक्षकांचे अर्ज भरणे बाकी आहे, याची माहिती उपलब्ध नाही.- शैलजा दराडे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, पुणे
विभागनिहाय सुधारीत वेळापत्रकऔरंगाबाद विभाग - २३ व २४ आॅक्टोबरपुणे विभाग - २४ व २५ आॅक्टोबरनाशिक विभाग - २५ व २६ आॅक्टोबरअमरावती, नागपूर व कोकण विभाग - २६ ते २८ आॅक्टोबर