लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : अरबी समुद्रात निर्माण झालेले ‘तौत्के’ चक्रीवादळ शनिवारी रात्रीनंतर कोकणाच्या किनारपट्टीपासून दूर जाण्यास सुरुवात होणार असली तरी त्याचा परिणाम दक्षिण कोकणासह दक्षिण मध्य महाराष्ट्रात जाणवण्यास सुरुवात झाली आहे. गोवा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे. रविवारी गोव्यासह सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
‘तौत्के’ चक्रीवादळाचा शनिवारी सकाळी वेग ताशी ७ किमी होता. आता दुपारी ते ताशी १३ किमी वेगाने पुढे सरकत आहे. तेव्हा ते पणजीपासून २५० किमी, मुंबईपासून ६२०, गुजरातमधील वेरावळपासून ८५० किमी दूर होते. शनिवारी सायंकाळी चक्रीवादळाचे तीव्र चक्रीवादळात रुपांतर झाले असून वाऱ्याचा वेग ताशी ९५ ते १०५ किमीवर पोहोचला आहे. उद्या रविवारी सायंकाळी या चक्रीवादळाचे अतितीव्र चक्रीवादळात रुपांतर होणार आहे. यावेळी त्याच्या वाऱ्याचा वेग ताशी १२५ ते १४५ किमीपर्यंत पोहोचणार आहे. रविवारी व सोमवारी या दोन्ही दिवशी हे चक्रीवादळ समुद्रातच अति वेगवान होत गुजरातच्या दिशेने पुढे सरकणार आहे. त्यानंतर १८ मे रोजी सकाळी अथवा दुपारी ते गुजरातमधील पोरबंदर आणि नालियादरम्यान जमिनीवर धडकणार आहे. जमिनीवर धडकल्यानंतर त्याचा वेग कमी होत जाणार असून १९ मे रोजी सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत त्याचा परिणाम जाणवत राहणार आहे. हे चक्रीवादळ गुजरातमधून पुढे राजस्थान व पाकिस्तानपर्यंत वाटचाल करणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
हे चक्रीवादळ गोवा व दक्षिण कोकणाच्या किनारपट्ट्याजवळून पुढे खोल समुद्राच्या दिशेने वळणार आहे. यादरम्यान, कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी तसेच सह्याद्री घाट परिसरात १६ मे रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर कोकण, पालघर जिल्ह्यात १७ मे रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
गुजरातमधील सौराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात १६ मेच्या दुपारनंतर मुसळधार पावसाची शक्यता आहे. १७ मे रोजी सौराष्ट्र व कच्छ आणि दीव परिसरात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. जुनागड, गीर सोमनाथ जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.
कोचीत दिवसात २०९ मिमी पाऊस
चक्रीवादळामुळे केरळमध्ये सध्या अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे. येथे एका दिवसात २०९ मिमी पावसाची नोंद झाली असून मे महिन्यात एकाच दिवसात पडलेला हा सर्वाधिक पाऊस आहे. याशिवाय पेमडे २०८, देवरा १३७, पेरियार १०१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. कर्नाटकातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे. गोव्यातील दाभोलिम, महाबळेश्वर येथे ३१ मिमी पावसाची नोंद झाली होती. उत्तर पूर्व राजस्थान व लगतचा भाग ते मराठवाडादरम्यान कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे मराठवाड्यातील काही ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. शनिवारी दिवसभरात कोकणातील अनेक ठिकाणी पाऊस पडला. रत्नागिरीत १०, कोल्हापूर येथे २ मिमी पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी आकाश ढगाळ होते.
घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता
पुणे शहरात रविवारी आकाश सामान्यत: ढगाळ राहून मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व मुसळधार स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. घाट परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.