लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : आपल्याकडे भाषांतर क्षेत्र हे कायमच दुर्लक्षित राहिलं आहे. खरंतर भाषांतरं व्हायला हवीत. वेगवेगळ्या भाषांमधल्या कलात्मक संवेदना पोहोचण्यासाठी त्याचा उपयोग होतो. भाषांतर झालं तरी ते सादर करताना सांस्कृतिक संचित, स्थानिक परंपरा लक्षात घ्याव्या लागतात. त्यानुसार त्यात बदल करावे लागतात. भाषांतर झालं म्हणजे, माणसाने नुसता सदरा बदलला असं होत नाही. आत्म्याचं आत्म्यात रुपांतर झालं पाहिजे, असे मत ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांनी व्यक्त केले.
प्रसिद्ध भाषांतरकार निनाद जाधव यांनी ‘ययाती आणि देवयानी’ या संगीत नाटकांच्या केलेल्या इंग्रजी भाषांतरित पुस्तकांच्या प्रकाशनाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी आमदार उल्हास पवार यांनी भूषविले. कार्यक्रमाची सुरुवात कुसुमाग्रजांच्या नांदीने झाली.
आळेकर म्हणाले की, भाषेतलं सांस्कृतिक संचित लेखकांना केव्हा ना केव्हा तरी मोह घालतं. ययाती आणि देवयानी नाटकाचे भाषांतर मला महत्त्वाचं वाटतं. कारण याच्या मधल्या कथेचा आजच्या काळात कंटेम्पररी रेलेवन्स आहे. याच्यातला एक समकालीनत्व इंग्रजीत वाचून एखाद्या दिग्दर्शकाला कदाचित आव्हानात्मक वाटेल. यातला अर्थनिर्णय वापरून एखाद्याला संपूर्ण नवा आयाम आजच्या काळातला सादर करावासा वाटेल. त्यामुळे भाषांतर व्हायला पाहिजे. आपल्या संगीत रंगभूमीचं संचित, भाषांतरामुळे इतर भाषेमध्ये, सांस्कृतिक संवेदनेमध्ये जाण्यासाठी एक पायवाट तयार होते. असच्या असं झालं पाहिजे असं नाही. त्यातला आत्मा शोधावा लागतो. त्यासाठी तरुण रंगकर्मींनी प्रयत्न करायला हवेत.
निनाद जाधव यांनी मराठी संगीत नाटक अमराठी लोकांपर्यंत पोहोचावं आणि त्यांनी त्याचे प्रयोगही करावेत यासाठी हा भाषांतराचा प्रयत्न केला आहे. नाटकातली पद्य मुक्तछंदामध्ये भाषांतरीत केली असल्याचे सांगितले. नाटकातल्या सादरी करणाबाबत विचार मांडताना त्यांनी एका गाण्याचा इंग्रजी आविष्कार देखील सादर केला.
अध्यक्षीय भाषणात उल्हास पवार म्हणाले की, बाळासाहेब भारदे भाषांतरबद्दल म्हणायचे की भाषांतर म्हणजे एका आत्म्याने दुसऱ्या आत्म्यामध्ये विलीन होणे. ययाती आणि देवयानी नाटकाचे भाषांतर निनादने आत्मीयतेने केले आहे.
त्याने आत्मा त्यात ओतला आहे. एका भाषेतून दुस-या भाषेत भाषांतरं झाली तर भाषाही समृद्ध होतील ही खऱ्या अर्थांने आंतरभारतीची किंवा गांधीजींची कल्पना होती.