पुणे : पोलीस दलातील बदल्यांमध्ये जेवढी पारदर्शकता असेल तेवढी महत्वाची आहे. ओळखीच्या किंवा वशिलेबाजी करणाऱ्या लोकांना चांगल्या ठिकाणी बदली मिळण्यापेक्षा रीतसर अर्ज मागवून पोलिसांना संधी दिल्यास निश्चितच एक चांगला संदेश पोहोचेल. त्यामुळे पुणेपोलिसांनी जनरल ट्रान्सफर पोलीस मॅनेजमेंट सिस्टीम ( जीटीपीएमएस) ही विकसित केलेली प्रणाली अत्यन्त फायदेशीर असल्याचे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.
गृहमंत्री पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी पहिल्यांदाच पुण्याच्या पोलीस आयुक्तालयाला भेट दिली. त्यांना पोलीस सलामी देण्यात आली. आयुक्तालयातील भरोसा विभागातील बाल सहाय्यता कक्ष, महिला सहाय्यता आणि ज्येष्ठ नागरिक कक्ष तसेच गुन्हे शाखेला त्यांनी भेट देऊन कामाची माहिती करून घेतली. त्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.
आजवर पुणे पोलिसांनी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. नुकतीच पोलिसांच्या अंतर्गत बदल्यांसाठी जीटीपीएमएस ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे, त्याचे वळसे पाटील यांनी कौतुक केले. ही प्रणाली पुण्यासह इतर ठिकाणी देखील सुरू झाली आहे. पोलीस दलातील बदल्यांमध्ये पारदर्शकता महत्वाची आहे. या प्रणालीचा पोलीस दलाला फायदा होणार असल्याचे ते म्हणाले.
मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष केला नाही तर वेळ निघून जाईल असे वक्तव्य करणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर वळसे पाटील यांनी टीका केली. " सध्या कोरोनामुळे पोलीस व आरोग्य विभागावर ताण आहे. त्यामुळे कोणीही चितावणीखोर वक्तव्य करु नये" असा टोला त्यांनी लगावला.
सराईत गुंड वाघाटे याच्या अंत्ययात्रेला निघालेल्या रॅलीवर भाष्य करताना त्यावर पोलिसांनी योग्य ती कारवाई केली आहे. यापुढे असे प्रकार झाल्यास कडक कारवाई केली जाईल. कुठल्याही प्रकाराची गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जालना येथील भाजपा कार्यकर्त्याला पोलिसांनी केलेल्या मारहाणीविषयी विचारले असता ते म्हणाले, ही घटना 9 एप्रिलची आहे. कार्यकर्ते रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागामध्ये (आयसीयू) गोंधळ घालत होते.त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली. मात्र, ही कारवाई जरा जास्तच झाली. याबाबत जालना पोलीस अधिक्षकांना सांगून त्यांच्यावर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.
संभाजीराजे यांनी येत्या 6 जूनपर्यंत मराठा आरक्षणावर कोणता निर्णय झाला नाही तर रायगडापासून आंदोलनाला सुरुवात करू असा इशारा दिला आहे त्यावर वळसे पाटील म्हणाले, न्यायालयाने एकदा निर्णय दिल्यानंतर तो सर्वाना बंधनकारक राहातो.यासाठी आता केंद्रालाच कायद्यात सुधारणा किंवा घटनादुरुस्ती करावी लागेल आणि या मराठा आरक्षणाला संरक्षण द्यावे लागेल...