पुणे : येणाऱ्या काळात ससून रुग्णालयात सर्व प्रकारच्या अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया अत्यल्प दरांत ससून रुग्णालयात सुरू करण्याचे प्रशासनाचे ध्येय आहे. वैद्यकीय महाविद्यालयात प्रशिक्षण घेणारे प्रत्येक विद्यार्थी, परिचारिका आणि कर्मचारी यांनी याबाबत अद्ययावत माहिती प्राप्त करून ती जनमाणसांत पोहोचविणे गरजेचे आहे असे अवाहन ससूनचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. नरेश झंजाड यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अवयवदान जनजागृती अभियानाअंतर्गत बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ७ एप्रिल राेजी मस्तिष्क मृत (ब्रेन डेड), मानवी अवयवदानाबाबतच्या जनजागृती मोहिमेचा शुभारंभ डॉ. झंजाड यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बाेलत हाेते.
या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थी तसेच अधिकाऱ्यांना मानवी अवयवदानाबाबत चित्रफित दाखवण्यात आली. त्यानंतर सर्वांनी मानवी अवयव दानाच्या जनजागृतीची शपथ घेतली. या कार्यक्रमामध्ये महाविद्यालयाचे अध्यापक, विद्यार्थी, रुग्णालयाच्या परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांनी भाग घेतला. या कार्यक्रमाच्या वेळी पोस्टर, रांगोळी, वक्तृत्व आणि निबंध लेखनाच्या स्पर्धेचे आयोजन विद्यार्थी परिषदेकडून करण्यात आले.
कार्यक्रमासाठी संस्थचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर, उपअधिष्ठाता डॉ. आरती किणीकर, डॉ. अजय तावरे, पीएसएम विभागाचे प्रमुख डाॅ. जगन्नाथ दीक्षित, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय जाधव, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. येल्लापा जाधव, विद्यार्थी परिषदेच्या सांस्कृतिक सल्लागार डॉ. स्वाती शाह, नर्सिंग प्रिन्सिपल डॉ. कल्पना कांबळे, नर्सिंग मेट्रन सोनवलकर आणि राज्यस्तरीय समन्वयक डॉ. हरीश टाटीया यांनी मार्गदर्शन आणि सहाय्य केले.