लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ३१ डिसेंबरला नववर्षाच्या स्वागतासाठी कॅम्प परिसर व १ जानेवारीला दगडुशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर भाविक येत असतात. त्यामुळे या दोन दिवशी कॅम्प व शिवाजी रोडवरील वाहतूकीत बदल करण्यात येत आहे.
३१ डिसेंबर रोजी कॅम्प भागातील वाहतूकीत सायंकाळी ५ वाजेपासून गर्दी संपेपर्यंत बदल केला आहे. महात्मा गांधी रोडवरुन येणारी वाहतूक १५ ऑगस्ट चौक येथे बंद करुन कुरेशी मशीद व सुजाता मस्तानी चौकाकडे वळविणार आहे. ईस्कॉन मंदिर चौकाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, अरोरा टॉवरकडे जाणारी वाहतूक बंद करणार आहे. तसेच ३१ डिसेंबर रोजी नववर्षानिमित्त होणारी गर्दी लक्षात घेऊन शहरातील मुख्य ३० ठिकाणचे सिग्नल मध्यरात्री १ वाजेपर्यंत सुरु ठेवणार आहे.
१ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजेपासून दगडुशेठ गणपती मंदिरामध्ये भाविकांची गर्दी संपेपर्यंत शिवाजी रोडवरील चारचाकी वाहने व सर्व प्रकारच्या बसगाड्यांना वाहतुकीसाठी बंदी करणार आहे. त्यांनी स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रोड खंडोजी बाबा चौक, टिळक रोडने इच्छितस्थळी जावे. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी केले आहे.