पुणे : बाहेरगावाहून शहरात आलेल्या तसेच शहरातील प्रवाशांना एकाच ठिकाणी मेट्रो, मोनोरेल, पीएमपी, एसटी, रिक्षा तसेच टॅक्सी अशी सर्व प्रकारची प्रवासी वाहने उपलब्ध करून देण्यासाठी जेधे चौकात बहुउद्देशीय वाहतूक केंद्र प्रस्तावित करण्यात आले आहे. या केंद्राच्या निर्मितीला राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी गुरुवारी तत्त्वत: मान्यता दिली आहे. पुढील ६ महिन्यांत एसटी प्रशासन आणि महापालिका यांनी याबाबतचा संयुक्त प्रस्ताव तयार करून मान्यतेसाठी ठेवण्याच्या सूचना रावते यांनी दिल्या. त्यामुळे प्रकल्प आराखडा तयार असूनही गेल्या ४ वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पाला गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, आमदार माधुरी मिसाळ यांनी या प्रकल्पाबाबत रावते यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर आज त्यासाठी प्राथमिक बैठक घेण्यात आली. तीय हा संयुक्त प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.पालकमंत्री गिरीश बापट महापालिका आयुक्त कुणाल कुमार, आमदार भीमराव तापकीर, पीएमपीचे सहव्यवस्थापकीय संचालक डी. पी. मोरे, वाहतूक पोलीस उपायुक्त सारंग आवाड, प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील हे या वेळी उपस्थित होते.>या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे. त्यामुळे हा प्रकल्प बीओटी तत्त्वावर राबविणे योग्य असल्याचे मत आयुक्त कुणाल कुमार यांनी व्यक्त केले. मात्र, हा प्रकल्प बीओटी तत्त्वावर न राबविता पीपीपी तत्त्वावर राबविण्याची मागणी आमदार मिसाळ यांनी केली. तसेच, हा प्रकल्प वाहतुकीसाठीचा असल्याने त्या ठिकाणी जास्तीत जास्त वाहतुकीसाठीच्या सुविधा देऊन कमीत कमी व्यावसायिक जागा ठेवण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली. दरम्यान, एसटी प्रशासनाकडूनही स्वारगेट स्थानकाच्या विकासासाठी स्वतंत्र सल्लागार नेमण्यात आला असून, त्याच सल्लागाराच्या माध्यमातून या केंद्राचे काम करण्याबाबत निर्णय घेण्यात यावा, असे रावते यांनी सुचविले. त्याला बापट यांच्यासह आयुक्त कुणाल कुमार यांनीही सहमती दर्शविली.
स्वारगेट होणार ट्रान्सपोर्ट हब
By admin | Published: April 22, 2016 1:16 AM