अभिजित कोळपे, पुणेदहा वर्षांपूर्वी रस्ते अरुंद असतानाही पुण्याहून शिरूरला जाण्यासाठी फक्त दीड तास लागायचा. आज रस्त्याचे रुंदीकरण झाले. त्यामुळे वाहतूक वेगवान झाली. मात्र, प्रवासाची वेळ कमी होण्याऐवजी त्यामध्ये वाढच होताना दिसत आहे. मुख्यत: लोकांनी केलेल्या अतिक्रमणामुळे आव्हळवाडी फाटा, केसनंद फाटा, लोणी कंद, कोरेगाव भीमा, शिक्रापूर आणि कारेगाव येथील तीस ते पस्तीस फुटांच्या रस्त्याचा केवळ दहा फूटच वापर होत आहे. त्यामुळे रस्ते मोठे होऊनही वारंवार वाहतूककोंडीची समस्या गंभीर बनत चालली आहे. परिणामी पुण्याहून शिरूरला पोहोचण्यासाठी तब्बल दोन ते अडीच तास लागत असल्याचे या मार्गावर नियमितपणे एसटी बसच्या फेऱ्या करणाऱ्या चालक आणि वाहक यांनी सांगितले. शिवाजीनगरहून शिरूरची एसटी बस सकाळी १० वाजून ४५ मिनिटांनी निघाली. अतिक्रमण, बेशिस्त वाहनचालकांमुळे तसेच रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्यांमधून वाट काढत शिरूरला पोहोचली ती दुपारी १ वाजून १० मिनिटांनी. रस्ते मोठे होऊनही ७० किलोमीटरच्या अंतरासाठी तब्बल २ तास २५ मिनिटे पोहोचायला लागली. अशीच परिस्थिती शिरूरहून पुण्याला येताना जाणवली. ४ वाजता निघालेली एसटी पुण्यात सायंकाळी ६ वाजून २० मिनिटांनी पोहोचली. या मार्गावर प्रवास करणारे त्रस्त झाले आहेत.
अतिक्रमणामुळे होतेय वाहतूककोंडी
By admin | Published: December 25, 2014 11:25 PM