जेजुरी : तीर्थक्षेत्र जेजुरीनजीक असलेल्या कऱ्हा नदीवरील नाझरे जलाशयावर गेलेल्या भाविकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला. ही घटना रविवारी (दि. ३१) सकाळी ८.३० च्या दरम्यान घडली. स्थानिक तरुणांनी या भाविकास वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला; मात्र यश आले नाही. गिरीश किसन घेटे (वय४८ , रा. इगतपुरी जि. नाशिक) असे पाण्यात बुडून मृत्युमुखी पडलेल्या भाविकाचे नाव आहे. चंद्रकांत किसन घेटे यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, की गिरीश किसन घेटे आणि चंद्रकांत किसन घेटे हे आपल्या परिवार-कुटुंबासह खाजगी वाहनाने (तवेरा, एम.एच. २४-टी ९००९) इगतपुरी (जि. नाशिक) येथून जेजुरीला खंडेरायाच्या दर्शनासाठी आले होते. देवदर्शनापूर्वी सर्वजण नाझरे जलाशयावर कऱ्हास्नानासाठी गेले होते. या वेळी पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने गिरीश घेटे यांचा १४ वर्षीय पुतण्या बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी गिरीश घेटे पाण्यात उतरले. पुतण्याला वाचवण्यात त्यांना यश आले; परंतु ते खोल पाण्यात ओढले गेले. दरम्यान, घेटे परिवाराचा आरडाओरडा ऐकून स्थानिक व्यावसायिक, तरुण बाळू एकनाथ कुंजीर, खंडू काशिनाथ चव्हाण, अजित मोहन रणधीर यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बुडणाऱ्या भाविकास वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला; अथक प्रयत्नानंतर पाण्यात बुडालेल्या गिरीश घेटे यांना पाण्याबाहेर काढल्यानंतर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले होते.
नाझरे जलाशय ठरतोय मृत्यूचा सापळा
By admin | Published: June 01, 2015 5:25 AM