लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या एका कंपनीने आयुक्तांकडे केलेल्या सादरीकरणावरून महापालिकेत सोमवारी सत्ताधारी भारतीय जनता पार्टीत फूट पडत असल्याचा धुरळा उडाला. पालकमंत्री गिरीश बापट व महापालिका पदाधिकारी यांच्यात बेबनाव झाल्याची चर्चा सुरू झाली. घटनाही तशाच घडत गेल्याने या चर्चेला चांगलाच जोर चढला. या कंपनीने महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे आपल्या प्रकल्पाचे प्रेझेंटेशन केले. त्या वेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांशिवाय कोणीही पदाधिकारी उपस्थित नव्हता. त्यामुळे पदाधिकाऱ्यांमध्ये हे कसले प्रेझेंटेशन आहे, याची विचारणा सुरू झाली. एकाही पदाधिकाऱ्याला याबद्दल काहीही माहिती नव्हती. महापौर मुक्ता टिळक या कार्यालयात उपस्थित होत्या. त्यांनी आयुक्त कार्यालयात विचारणा केल्यानंतर कंपनीच्या संबंधित प्रतिनिधींनी पदाधिकाऱ्यांसाठीही हे सादरीकरण करण्याची तयारी दर्शवली.त्याप्रमाणे त्यांनी महापौरांच्या दालनात हे सादरीकरण केले, त्या वेळी तिथे पदाधिकारी म्हणून फक्त स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ हेच उपस्थित होते. सभागृह नेते श्रीनाथ भिमाले नव्हते. या सर्व घटनांची माहिती विरोधी पक्षातील एका चाणाक्ष नेत्याने सर्वत्र पोहोचवली. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी एका कंपनीला पालकमंत्री गिरीश बापट यांच्या मध्यस्थीतून आयुक्तांना प्रेझेंटेशन करण्यात सांगण्यात आले. पदाधिकाऱ्यांना त्याची माहिती देण्यात आली नाही. महापालिका पदाधिकारी पालकमंत्र्यांच्या विरोधात, दोन गट पडले अशी जोरदार चर्चा त्यानंतरच सुरू झाली.महापौर मुक्ता टिळक यांनी फूट, नाराजी वगैरे सर्व वावड्या असल्याचे सांगितले. कंपनी चेन्नई येथील होती. पालकमंत्री मुंबईत आहेत. पर्रिकर यांचा तर येथे काहीही संबंध नाही. असे असताना केवळ राजकीय डाव म्हणूनच या अफवा पसरवण्यात येत आहेत, असे त्या म्हणाल्या.
कचरा कंपनीवरून भाजपात फुटीचा धुरळा
By admin | Published: May 23, 2017 5:39 AM