चाकण : परिसरातील गावांमध्ये कचºयाची समस्या दिवसेंदिवस गहण होत चालली आहे. बिरदवडी येथील मुळे वस्तीवरील नागरिक आंबेठाण रस्त्यावर कचरा भिरकावतात. त्यामुळे या रस्त्यावर कचºयाचा ढीग अक्षरश: हनुमानाच्या शेपटीसारखा लांबत चालला आहे. शिवाय शासनाने प्लॅस्टिकबंदी करूनही या कचºयाच्या ढिगामध्ये प्लॅस्टिकचे प्रमाण जास्त पाहायला मिळत आहे.
चाकण परिसरात मोठ्या प्रमाणावर झालेल्या औद्योगिकीकरणामुळे येथील प्रत्येक गावात नागरीकरण वाढले आहे. परिसरातील गावांमधून दररोज हजारो टन कचरा निघतो. या कचºयाची विल्हेवाट लावणे हे सर्व ग्रामपंचायतींपुढे मोठे आव्हान आहे. कचºयापासून खतनिर्मिती केल्यास मोठी समस्या सुटेल, पण त्यासाठी कोणीही प्रयत्न करताना दिसत नाही. प्लॅस्टिकबंदी घोषित केल्यापासून अनेक नागरिकांनी कापडी पिशव्या वापरण्यास सुरुवात केली आहे, मात्र अजूनही काही नागरिक बिनधास्तपणे प्लॅस्टिक पिशवी, कॅरीबॅग वापरीत आहेत. चाकण नगरपरिषद व परिसरातील सर्व ग्रामपंचायतींनी अधिकृतपणे रिक्षा फिरवून दवंडी देऊन प्रबोधन केले तरीही नागरिक प्लॅस्टिक वापरताना दिसत आहे. प्लॅस्टिक वापरणारांवर दंडात्मक कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. जोपर्यंत मोठ्या प्रमाणावर दंडात्मक कारवाई होत नाही तोपर्यंत नागरिक याबाबत गांभीर्याने घेणार नाहीत असे चित्र दिसत आहे. घरांमधून निघणारा हा कचरा नागरिक परिसरातील रस्त्यांच्या कडेला फेकतात. ग्रामपंचायती घंटा गाड्यांमधून कचरा गोळा करतात, पण कंपन्यांमध्ये नोकरी करणारे बहुतांश नवरा-बायको दोघेही कामावर कामावर जाता-जाता घरातील कचरा ढिगांवर टाकतात. कंपन्यांचा कचरा आळंदी घाटातील वन विभागात व एमआयडीसीच्या रस्त्यांच्या कडेला टाकला जातो, तर परिसरातील ग्रामपंचायतींचा कचरा खराबवाडीच्या दगड खाणीत गुपचूप टाकला जातो. एमआयडीसीतील अराई कंपनी ते सारा सिटी रस्त्यावर औद्योगिक कंपन्यांनी कचºयाचे आगार केले आहे. या कचºयाच्या ढिगावर बेवारस भटकी कुत्री ताव मारताना दिसत आहेत.