पुणे : गावातील समस्या व विविध विकासकामांसाठी कायमस्वरूपी समन्वय अधिकारी नियुक्त करणे, बाधितांच्या वारसांना महापालिकेत नोकरी देणे, गावातील रस्ते, ड्रेनेज व पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर तातडीने तोडगा काढण्याचे आश्वासन महापालिका प्रशासनाने दिल्याने, फुरसुंगीच्या नागरिकांनी कचरा डेपोच्या विरोधातील आंदोलन गुरुवारी मागे घेतले. यामुळे दोन दिवसांपासून शहराची झालेली कचरा कोेंडी फुटली आहे.हरित न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने फुरसुंगी येथील कचरा डेपोवरील ओपन डम्पिंग तातडीने बंद करावे या प्रमुख मागणीसह कचरा डेपो परिसरातील नागरिकांचे प्रश्न तातडीने सोडवावेत यासाठी उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथील ग्रामस्थांनी बुधवार (दि. १) पासून कचरा डेपो बंद आंदोलन सुरू केले होते.अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी बुधवारी ग्रामस्थांची भेट घेऊन आंदोलन मागे घ्यावे यासाठी चर्चा केली; परंतु रात्री उशिरापर्यंत मागण्यावर कोणतेही ठोसआश्वासन मिळत नसल्याने गुरुवारीदेखील कचऱ्यांची एकही गाडी येऊ दिली नाही.यामुळे गुरुवारी दुपारी पुन्हा निंबाळकर यांच्या कार्यालयात स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, घनकचरा विभागाचे प्रमुख सुरेश जगताप यांनी ग्रामस्थांशी पुन्हा चर्चा केली.या चर्चेदरम्यान ग्रामस्थांनी कचरा डेपोमुळे बाधित झालेल्या ग्रामस्थांच्या कुटुंबांना महापालिकेने कायमस्वरूपी सेवेत घ्यावे, भेकराईनगर ते फुरसुंगी गावापर्यंत सिमेंट काँक्रिटचा रस्ता करावा, मंतरवाडी ते सोलापूर रोडपर्यंत एक्स्प्रेस ड्रेनेज लाइनच्या कामाची सुरुवात करावी, मंतरवाडी चौक ते फुरसुंगी गावातील दशक्रिया विधी घाटाचे काम लवकर पूर्ण करावे, फुरसुंगी गावातील वॉटर फिल्टर प्लँटसाठी खासदार संजय काकडे यांनी निधी दिला आहे. त्यातून या प्लँटचे काम तातडीने सुरू करावे, फुरसुंगीतून सोलापूर रस्त्याकडे जाणाºया पुलाचे काम तातडीने सुरू करावे या मागण्या ग्रामस्थांनी मांडल्या.दोन दिवस नाही उचलला कचराया आंदोलनामुळे शहरातील काही भागातील कचरा दोन दिवस उचलला गेला नाही. भर पावसाळ्यात कचºयाचे आंदोलन पेटले असते, तर शहरात कचºयाची गंभीर समस्या निर्माण झाली असती.यामुळे गेल्या आठ दिवसांपासून महापालिका प्रशासन, पदाधिकारी फुरसुंगी आणि उरळी देवाचीच्या ग्रामस्थांच्या सतत संपर्कात होते.कायदेशीर दृष्ट्या वारसदारांना पुढील महिनाभरात महापालिका सेवेत कायम केले जाईल. तसेच, विकासकामांचे इस्टिमेट तयार करून, तातडीने निविदा प्रक्रिया राबविण्यात येईल, असे आश्वासन ग्रामस्थांना दिल्यानंतर, त्यांनी आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले. यानंतर दुपारपासून पूर्ववत कचरा डेपो सुरू करण्यात आल्याचे निंबाळकर यांनी सांगितले.
कचराकोंडी फुटली; फुरसुंगी ग्रामस्थांच्या मागण्यांवर तोडगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2018 5:00 AM