पुणे : शहरात कोरोनाची पहिली लाट सुरू आल्यापासूनच शववाहिका चालक अहोरात्र काम करीत आहेत. या चालकांना तब्बल बारा तास काम करावे लागत आहे. साक्षात मृत्यूसोबत दररोज प्रवास करणाऱ्या या चालकांना मागील तीन दिवसांपासून पीपीई किट दिले जात नसल्याचे समोर आले आहे. दिवसभर मृतदेहांची सोबत करणाऱ्या या चालकांचा जीव त्यामुळे टांगणीला लागला आहे.
सध्याची परिस्थिती अतिशय बिकट आहे. परिस्थितीचे भान राखत हे चालक कोणतीही कुरबूर न करता आपले कर्तव्य निभावत आहेत. या चालकांनी पुरेशी सुरक्षा साधने पुरविण्याची तसदीही पालिकेचे अधिकारी घेत नसल्याचे चित्र आहे. मग या चालकांना भत्ता देण्याची गोष्टच दूर राहिली.
शहरात फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोनाचे रुग्ण वाढत गेले. त्यापटीत मृत्यूचा आकडा देखील वाढला. साधारण ४० ते ७० यादरम्यान रोज मृत्यू होत आहेत. खाजगी आणि शासकीय रुग्णालयांमधून कोविड मृतदेह स्मशानभूमीपर्यंत नेण्याची जबाबदारी या शववाहिका चालकांवर आहे. या चालकांना कोरोना संसर्गाचा धोका आहे. अनेक चालकांच्या घरी वृद्ध आई वडील, लहान मुले आहेत. त्यामुळे त्यांना जोखीम पत्करून काम करावे लागते. त्यांना पीपीई किट, हॅन्डग्लोव्ह्ज आणि मास्क पुरविणे ही पालिकेची जबाबदारी आहे. मात्र, मागील तीन दिवसंपासून ना पीपीई किट मिळते आहे ना हॅन्डग्लोवज ना मास्क. हॅण्डग्लोवजसुद्धा आम्हालाच विकत घेऊन वापरावे लागत असल्याचे काही चालकांनी सांगितले.
----
एकूण रुग्णवाहिका- ८०
कोविडसाठीचा रुग्णवाहिका- ६९
चालक संख्या - १४०
नॉन कोविडसाठी रुग्णवाहिका- ११
चालक संख्या- २२
शववाहिका - २१
चालक संख्या - ४२