पुणे : शहरात कोरोनाची दुसरी लाट धडकल्यापासून शववाहिका चालक अहोरात्र काम करीत आहे. या चालकांना तब्बल बारा तास काम करावे लागत आहे. साक्षात मृत्यूसोबतच त्यांना दररोज प्रवास करावा लागतो. परंतु कोणतीही कुरबूर न करता हे चालक आपले कर्तव्य निभावत आहेत. या चालकांनी पुरेशी सुरक्षा साधने पुरविली जावीत आणि भत्ता मिळावा, अशी माफक अपेक्षा व्यक्त केली आहे.
शहरात फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोनाचे रुग्ण वाढत गेले. त्यापटीत मृत्यूचा आकडा देखील वाढला. साधारण ४० ते ७० यादरम्यान रोज मृत्यू होत आहेत. खासगी आणि शासकीय रुग्णालयांमधून कोविड मृतदेह स्मशानभूमीपर्यंत नेण्याची जबाबदारी या शववाहिका चालकांवर आहे. अनेकदा रुग्णालयातून मृतदेह मिळण्यास उशीर होतो. तर स्मशान भूमी मध्ये वेटिंग असल्यामुळे येथेही पाच - सहा तास वेटिंगवर थांबावे लागते. त्यामुळे या चालकांना कोरोना संसर्गाचा धोका आहे. अनेक चालकांच्या घरी वृद्ध आईवडील, लहान मुले आहेत. त्यामुळे त्यांना जोखीम पत्करून असे काम करावे लागते.
मात्र, त्या तुलनेत त्यांना ना वेतन मिळते, ना भत्ते मिळतात. पालिकेकडून ठेकेदारांमार्फत बहुतांश चालक घेण्यात आलेले आहेत. त्यामुळे या चालकांना फार मर्यादित सुविधा दिल्या जातात. त्यांना दिवसभरासाठी फक्त एकच पीपीई किट उपलब्ध करून दिले जात असल्याचे काही चालकांनी सांगितले. तर, आमची महिन्यातून एकदा किंवा दर पंधरा दिवसांनी कोरोना चाचणी केली जावी अशी अपेक्षा काही चालकांनी व्यक्त केली. यासंदर्भात, पालिका प्रशासनाने ठेकेदारांना आवश्यक सूचना देऊन चालकांच्या सुरक्षिततेकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे.
----
एकूण रुग्णवाहिका- ८०
कोविडसाठीच्या रुग्णवाहिका- ६९
चालक संख्या - १४०
नॉन कोविडसाठी रुग्णवाहिका- ११
चालक संख्या- २२
शववाहिका - २१
चालक संख्या - ४२
----
दिवसाला महापालिकेला कॉल - २००
१०८ रुग्णवाहिकेला कॉल - २५०
----
पालिकेकडून पीपीई किट पुरविले जाते. मात्र, ड्युटी १२ तास करावी लागते. आम्हाला भत्तेही मिळायला हवेत. घरात लहान मुले आणि वृद्ध आईवडील असतात. त्यामुळे आमची कोरोना चाचणी व्हायला हवी. दिवसाला साधारण ४-५ मृतदेह न्यावे लागतात.
- कैलास शिंदे, चालक
-----
दिवसाला एकाच पीपीई किटमध्ये काम करा, असे आम्हाला सांगितले जाते. यासोबतच हॅन्डग्लोव्हज आणि मास्क पुरेसे दिले जात नाहीत. बारा तास एकाच किटवर काम कसे होणार? वेटिंगमुळे स्मशानभूमीत अधिक वेळ जातो. त्यामुळे सततचा ताण असतो. काळजी घेणे आवश्यक आहे.
- देविदास शिंदे, चालक
----
काही स्मशानभूमीत केवळ एकच कर्मचारी असल्याने मृतदेह उतरवताना चालकांनाचा मदत करावी लागते. हा मृतदेह शितपेटीत ठेवणे अथवा अंत्यविधीसाठी दाहिनीमध्ये ठेवण्यासाठी मदत करावी लागते.